अंदाजपत्रकास सरकारकडून मंजुरी; रो-रो सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

उरण/अलिबाग : रेवस-करंजा जलमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यातील विघ्न दूर होऊ लागले आहेत. या रो-रो सेवेसाठी करंजा बंदर येथे १९ कोटी रुपये खर्चाची कामे यापूर्वीच सुरू असून रेवस बंदरावरही कामे करण्यातील निधीची अडचण दूर होण्याच्या मार्गावर आहे. रेवस बंदर येथे या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने २५ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईसह, पनवेल, उरण, अलिबाग, मुरूड तालुक्यातील नागरिकांना या सेवेचा फायदा होणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे.

रायगड जिल्ह्य़ाचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागला जाण्यासाठी करंजा ते रेवस हे अंतर रस्ता मार्गाने ८६ किलोमीटर आहे. तर जलमाग्रे हे अंतर केवळ ३ किलोमीटर आहे. सध्या या जलमार्गावर तर सेवेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. या जलमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सुरू केल्या आहेत. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्यांची वाहने बोटीने ने-आण करता येतील. यामुळे वेळ तसेच इंधनाची मोठी बचत होणार आहे.   विशेषत मुंबईतील जलसेवा बंद झाल्यानंतर अलिबागमधील नागरिकांकडून याच मार्गाचा पर्याय म्हणून अवलंब केला जातो. त्यामुळे ही जलसेवा महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने करंजा येथे १९ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू केली आहेत.

करंजा-रेवस रो-रो सेवेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने रेवस बंदरात २५ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. राज्य सरकारने सागरमाला प्रकल्पांतर्गत या अंदाजपत्रकाला मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे ५० टक्के हिश्श्याची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी सुचना मेरिटाईम बोर्डाला केली आहे.

तसेच आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेण्याचे आदेशही दिले आहेत. रेवस बंदरावर २५ कोटी रूपये खर्चून जेट्टीचे काम, वाहनांसाठी प्लॅटफॉर्म, विद्युत पुरवठा तसेच इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत.

रेवस-करंजा रो-रो सेवा सुरू व्हावी यासाठी मी सरकारस्तरावर पाठपुरावा केला होता. रेवस बंदर येथे कामांसाठी २५ कोटी खर्चाच्या प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे.

२०२० उजाडण्याची शक्यता

करंजा रो रो सेवेच्या जेट्टीचे काम येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर रेवस बंदराच्या जेट्टीच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहेत. ही सेवा सुरू होण्याकरिता २०२० उजाडण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.

स्थानिक मच्छीमारांचा होता विरोध

करंजा बंदरात नांगरण्यात येणाऱ्या मासेमारी बोटींवर परिणाम होऊन मच्छीमारांचे नुकसान होण्याच्या भीतीने करंजा येथील मच्छीमारांनी जेट्टीला विरोध केला होता. त्यामुळे करंजा येथील रो-रो जेट्टीचे काम रखडले होते. मात्र आता हा विरोधी मावळला असून करंजा १९ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात आली आहेत. तर दुसरीकडे रेवस बंदरावरही रो-रो सेवेच्या अनुषंगाने लवकरच कामे हाती घेण्यात येणार आहेत.