पनवेल – नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या ४८ वर्षीय महिला पोलीस हवालदार यांना घरी असताना रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या वेदना होऊ लागल्याने त्यांना खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल केले. उपचारार्थ त्यांचा काही मिनिटांत मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.
कळंबोली येथील सेक्टर १ येथील सत्यम पॅराडाईस इमारतीमध्ये राहणाऱ्या अश्विनी चिपळुणकर या नवी मुंबई पोलीस दलातील सूरक्षा विभागात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होत्या. ४८ वर्षीय अश्विनी यांना रविवारी सायंकाळी पाच वाजता छातीत कळ मारू लागल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खारघर येथील मेडीकव्हर रुग्णालयात दाखल केले. मात्र साडेसहा वाजण्याच्या सूमारास रुग्णालयात उपाचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
मार्च १९९९ साली अश्विनी या पोलीस दलात भरती झाल्या. अश्विनी यांच्या पश्चात २९ वर्षीय सूरज आणि १६ वर्षीय शान्तनू अशी दोन मुले आहेत. सूरज हा नोकरीनिमित्त दुबई येथे असतो आणि शान्तनू हा शिकतोय.