पनवेल : पनवेल पालिकेच्यावतीने ३७७ पदांसाठी ५४ हजार ५५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सरळसेवेची ही परिक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. लवकरच परिक्षेची तारीख पनवेल पालिका आयुक्त जाहीर करतील असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने बुधवारी जाहीर केले.
१३ जुलैपासून ४१ संवर्गातील गट ‘अ’ ते गट ‘ड’ या श्रेणीमधील पनवेल पालिकेच्या ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया सुरू झाली. भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पालिका स्थापन होऊन सहा वर्षे उलटली, पहिल्यांदा पालिकेच्या आस्थापनेसाठी पहिलीच भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील एकूण ३७७ पदांकरिता निवड प्रक्रीया होत आहे.
हेही वाचा – नवी मुंबई: माजी नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल
टीसीएस कंपनीने निश्चित केलेल्या राज्यभरातील विविध केद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी परिक्षेवेळी मोबाईल, ब्लूटूथ, डिजिटल घड्याळ अशा तंत्रांचा वापर न करण्यासाठी पालिका केंद्रांवर पोलीस बंदोबस्त आणि जामर बसविणार आहे. प्रत्येक केंद्रावर पालिकेचे एक नियंत्रण अधिकारी व एक सहाय्यक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नेमणूक पालिका करणार आहे. या भरती प्रक्रियेतून पालिकेस प्रशिक्षित व उच्च शिक्षित मनुष्यबळ मिळणार असल्याची माहिती पालिकेचे आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली.
हेही वाचा – कोपरखैरणेत विसर्जनानिमित्त अनेक रस्त्यावर नो पार्किंग…
पनवेल पालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत आहे. कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने,पदाधिकाऱ्याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांच्या विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करावी. परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. – गणेश देशमुख, आयुक्त ,पनवेल पालिका