एक्स्प्रेस-वेवर वेगमर्यादेचे उल्लंघन
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणाऱ्या ८३९ वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करून संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव महामार्ग पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्याचे काम सुरू आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सुरू झालेली ही धडक कारवाई महामार्गावरील २६ पोलिसांनी ‘स्पीडगन’च्या साह्य़ाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे द्रुतगती महामार्गावर वेगवान स्पर्धेला ब्रेक बसेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच वर्षांत २२२५ अपघातांमध्ये ५४९ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २ हजार ३९३ जण जखमी झाले आहेत. कळंबोली ते वडगाव या ९५ किलोमीटरवर हा मार्ग विस्तारला असून या मार्गावरील वाहतूक नियमनाची जबाबदारी महामार्ग पोलिसांच्या खांद्यावर आहे. परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नवीन परिपत्रकानुसार वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई होण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित व अप्पर पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली द्रुतगती महामार्गावर ही मोहीम हाती घेण्यात आली. दिवसा केलेल्या या कारवाईमध्ये कळंबोली महामार्ग पोलिसांच्या तीन चौक्यांमध्ये तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ८३९ जणांना या कारवाईदरम्यान पकडले. या वाहनचालकांकडून सुमारे एक लाख ६७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करून संबंधित वाहनचालकाचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याच्या कारवाईला सुरुवात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. बारटक्के यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
पोलिसांची संख्या वाढवा..
कळंबोली महामार्ग पोलीस ठाण्याच्या परिसरात बोरघाट, पळस्पे, खंडाळा, वाकण, महाडपर्यंतच्या महामार्गाची जबाबदारी आहे. हद्दीचा वाद टाळत या पोलिसांनी वडगाव येथेही कळंबोली महामार्गाचे सात पोलीस तैनात केले आहेत. कळंबोली महामार्ग पोलिसांकडे एकूण ८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळ आहे. मात्र कार्यालयीन कामकाज, सुरक्षा, चालक, बिनतारी यंत्रणेवर काम करणारे व इतर कामांसाठी तैनात असलेले असे एकूण १५ कर्मचारी वगळल्यास प्रत्यक्षात २६ कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना हा विभाग निम्याहून कमी मनुष्यबळावर ही जबाबदारी पार पाडत आहे. या कर्मचाऱ्यांकडे स्पीडगन आहेत, मात्र वेगात असलेली वाहने थांबविण्यासाठी थेट वाहनांना स्वत: अडविण्याशिवाय अन्य पर्याय नाही. आजपर्यंत कर्तव्य बजावताना या महामार्गावर चार पोलिसांचा अपघातात बळी गेला आहे, तर सहाजण जखमी झाले आहेत. या पोलिसांना वाहतूक नियमासाठी मोडकळीस आलेली सरकारी जीप आहे. सध्या पळस्पे, बोरघाट, खंडाळा, वाकण, वडगाव येथे मोठय़ा प्रमाणात ही कारवाई सुरू आहे. द्रुतगती महमार्गावर घाटात वाहन चालविताना ३० ते ५० किलोमीटरचा वेग आणि महामार्गावरून चालविताना ८० किलोमीटरच्या वेगाची मर्यादा वाहनचालकांनी पाळावी असे आवाहन पोलीस करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 839 drivers license will be suspended for violating speed rule
First published on: 06-02-2016 at 01:03 IST