नवी मुंबई : सिगरेटची उधारी पान टपरी चालकाने मागितल्याचा राग आल्याने एका ग्राहकाने त्याच्या डोक्यात अडकित्ता मारला. त्यातून सुरु झालेले भांडण सोडवण्यास शेजारील बार मालक आल्यावर त्यांच्याही डोक्यात पीत असलेल्या बिअरची बाटली फोडली आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

साहिल शेख असे यातील संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवारी रात्री त्याने कुठून तरी बिअर विकत घेतली. तो उघड्यावर बिअर पीत नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगर भागात असणाऱ्या बंटी फूड कॉर्नर जवळील एका पान टपरी वर थांबला. या पान टपरीचा तो नियमित ग्राहक आहे. विश्वकर्मा पंडित यांची ही पान टपरी आहे. साहिल याने विश्वकर्मा यांच्या कडे सिगरेटची मागणी केली. यावेळी विश्वकर्मा यांनी साहिल याला सिगरेट देत मागील उधारी आणि दिलेल्या सिगरेटच्या पैशांची मागणी केली.

उधारीची मागणी या क्षुल्लक कारणावरून साहिल याला राग आला. यातून साहिल याने पळून जात आहे का?, असे हिंदीतून बोलत अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली. दुसऱ्यांना उधारी मागितलीस तर कापून टाकील अशी धमकीही दिली. नेमके पान टपरीच्या काउंटर वर अडकित्ता होता. हा वजनदार आणि मोठा अडकित्ता साहिल याने घेत विश्वकर्मा याच्या डोक्यावर मारला. घाव एवढा जबरदस्त बसला की रक्ताची धार लागली.

हा प्रकार याच पान टपरी जवळ असलेल्या दुकानाचे मालक घटनास्थळी आले आणि त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने साहिल याने हातातील बिअरची बाटली दुकान मालकाच्या डोक्यात एवढ्या जोरात मारली की बाटली फुटली. फुटलेल्या बाटलीच्या काचा घेत साहिल याने स्वतःला जखमी केले होते.

हा प्रकार बुधवारी पावणे पाचच्या सुमारास घडला. यावेळी रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली. गर्दीला पाहून साहिल तेथून पळून गेला.

या घटने बाबत तुर्भे एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ते घटना स्थळी पोहचले. जखमी असणाऱ्या दोघांना रुग्णालय दाखल केले.तसेच विश्वकर्मा याने दिलेल्या तक्रारी वरून साहिल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. साहिल याला अद्याप अटक करण्यात आले नसून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.