‘ओमायक्रॉन’च्या धास्तीने लाभार्थी रांगेत

नवी मुंबई : पहिल्या लसमात्रेचे शहरातील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर व करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने दुसरी लसमात्रा घेण्यासाठी लस लाभार्थीकडून टाळाटाळ सुरू होती. मात्र गेली तीन-चार दिवस करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या धास्तीमुळे पुन्हा एकदा लसीकरणाला वेग आला आहे. महापालिकेच्या ‘हर घर दस्तक’ अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत ११,७४,७६६ जणांनी पहिली तर ७,८६,३५६ जणांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत. दुसरी लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाण एकूण लाभार्थीच्या तुलनेत अद्याप ७० टक्केपर्यंतच आहे. दिवाळीपूर्वी पालिकेकडे लस नव्हती मात्र लाभार्थी रांगेत होते. दिवाळीनंतर पालिकेकडे लस आहे पण लाभार्थी लस घेण्यास येत नसल्याचे चित्र होते. पालिकेकेडे बुधवापर्यंत एक लाखांपेक्षा अधिकच्या लसमात्रा शिल्लक आहेत.

लाभार्थी लस घेण्यास येत नसल्याने पालिकेने घरोघरी जात शोध सुरू केला होता. ‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत घराजवळ लस उपलब्ध करून दिली होती. आता ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवे निर्बंधही घालण्यात आले आहेत. त्यामुळे टाळाटाळ करणाऱ्या लसलाभार्थीनी आता सुरक्षा म्हणून लसवंत होण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह लसीकरण केंद्रावर लाभार्थी लस घेण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे लसीकरणाला आता गती मिळत आहे.

लाभार्थीनी आपल्या करोना लशीची पहिली मात्रा घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यावर लगेच नजीकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रावर जाऊन दुसरी मात्रा घ्यावी. संपूर्ण लस संरक्षित होणे गरजेचे आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख