वाशी पथकर नाक्यावर अपघात; भांडणानंतर दोन्ही वाहनचालकांचे घटनास्थळावरून पलायन

नवी मुंबई : मुंबई दिशेच्या मार्गिकेवर उभ्या असलेल्या वाहनाला मागील वाहनाने धडक दिल्याची घटना सोमवारी वाशी पथकर नाक्यावर घडली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. पण, तो इतका टोकाला गेला, की अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाने ठोकर देणाऱ्या गाडीची चावीच पळवून नेल्याने ऐन गर्दीच्या वेळी वाहने मार्गिकेत अडकून पडली. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांना कसरत करून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढावी लागली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

गेल्या सोमवारी गाडीचे चाक निखळल्याने याच भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर सोमवारी छोटय़ा अपघातानंतर वाशी पथकर नाक्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

सकाळी साडेनऊच्या सुमारास  एक प्रवासी वाहनाने पुढे असलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली. याचा राग आल्याने  इनोव्हामधील चालकाने प्रवासी वाहनचालकाला जाब विचारला आणि गाडीची किल्ली काढून घेतली आणि तेथून पलायन केले. या प्रकारामुळे गोंधळलेल्या प्रवासी वाहनाच्या चालकानेही स्वत:ची गाडी तेथेच टाकून पळ काढला. त्यामुळे दोन्ही वाहने मार्गिकेतच बंद अवस्थेत उभी होती. काही काळ वाहतूक पोलिसांच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. दोन्ही वाहने बराच वेळ मार्गिकेत अडकून पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही वाहने उचलून मार्गिकेबाहेर ठेवणाऱ्या वाहनाची (टोइंग व्हॅन) सोय करावी लागली. त्याच वेळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने वाहने हटविण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. या साऱ्या परिस्थितीत दुचाकीस्वारांनी मार्गिकेवरील छोटय़ा जागांमध्ये घुसखोरी केली होती.

संततधार पाऊस आणि खड्डे

* करोनाकाळात रुग्णवाहिकांना प्राधान्याने मार्ग मोकळा करून देण्यावर वाहतूक पोलिसांचा भर असतो. याच वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिका या मार्गिकेत अडकून पडलेल्या होत्या. मात्र, वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून त्या मार्गस्थ करण्यासाठी पोलिसांना मदत केली.

* आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने अनेक जण कार्यालय गाठण्याच्या घाईत होते. त्यात बाहेरगावावरून येणारी वाहने महामार्गावर गर्दी होती. संततधार पावसामुळे वाहतुकीचा वेग अधिकच मंदावला. त्यामुळे तुर्भे, नेरुळ आणि सीबीडीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यात उड्डाणपुलावर काही ठिकाणी संततधार पावसामुळे डांबरी आणि सीमेंटच्या रस्त्याबाहेर खड्डे  पडल्याने वाहनांची गती अधिकच मंदावली.

नेहमीपेक्षा जास्त वाहने महामार्गावर उतरल्याने आधीच वाहतूक मंदावली. त्यात वाशी पथकर नाक्यावर दोन वाहनचालकांमधील भांडणामुळे  वाहतूक कोंडी झाली. 

-भानुदास खटावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाशी