नवी मुंबई : कमी दराने फळ विक्री दाखवून उपकर बुडवणाऱ्यांवर आता एपीएमसी प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे. खासकरून सध्या आंबे विक्रीत ही अफरातफर केली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यावर प्रशासनाने आंबा विक्रीबाबत आंब्याची जात कोठून आणली इत्यादीबाबत स्पष्ट उल्लेख अनिवार्य केला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात बाजारभावापेक्षा कमी दराने फळांची विक्री झाल्याचे दाखवून एपीएमसीचा उपकर बेमालूमपणे बुडवण्यात येत होता. असे अनेक प्रकार घडत असून या बाबत एपीएमसी प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची शहानिशा करून एपीएमसी प्रशासनाने कडक पाऊले उचलण्याचे ठरवले आहे. काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना बाजार भावानुसार दर न आकारता बिले (देयके) दिल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सध्या फळ बाजारात आंबा, कलिंगड आदी फळांचा हंगाम चालू आहे.

हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?

हेही वाचा – नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

हेही वाचा – वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

बाजारात मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणांहून आंबे येत आहेत. यामध्ये आंब्याच्या विविध प्रकारच्या जाती असून प्रतवारीनुसार त्यांचे दरही वेगवेगळे आहेत. आंब्याची खरेदी केल्यावर व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांना देयके दिली जातात. खरेदीदारांना बाजार आवारातून बाहेर पडताना ही देयके दाखवून बाजार आवारातून बाहेर पडता येते. या खरेदीवर १ टक्के उपकर बाजार समितीला मिळतो; मात्र हा उपकर बुडवण्यासाठी अनेक व्यापारी देयकावर कमी दर दाखवून मालाचे बिल बनवून देतात. उदा. देवगड हापूस आंबा दिला गेला असला तर प्रत्यक्षात स्वस्त असलेल्या कर्नाटकी आंब्याचे देयक दिले गेले. त्यामुळे आंबा दिसतो म्हणून समिती बाहेर सोडले जाते, मात्र नेमका कुठला हापूस असा उल्लेख नसल्याने आंबा कुठला हे तपासणी करणाऱ्याला कळत नसल्याने उपकर बेमालूमपणे बुडवला जातो. अशा अनेक तक्रारी एपीएमसी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. बाजार समितीने आता व्यापाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक काढून व्यापाऱ्यांना दिले गेले आहे.