नेरुळमधील दत्तगुरू गृहसंस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नेरुळमधील दत्तगुरू गृहसंस्थेतील १३६ कुटुंबे धोकादायक इमारतीत राहात होती. पालिकेनेच बांधलेल्या बेकायदा मंडईमुळे इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. अखेर बेकायदा जय दुर्गामाता मंडई पाडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे दत्तगुरू गृहसंस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई पालिकेने सारसोळे सेक्टर-६ येथील भूखंड क्रमांक ११ वर बेकायदा मंडई बांधली आहे. त्यात ३० ओटे बांधण्यात आले आहेत. त्यासाठी २४ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च पालिकेने केला आहे. परंतु पालिकेवरच बेकायदा मंडई पाडण्याची नामुष्की ओढवली आहे. सिडकोने दत्तगुरू इमारतीच्या शेजारीच पालिकेने सिडकोच्या भूखंडावर बांधलेली मंडई सात दिवसांत तोडण्याचे आणि येथील जागा सिडकोने या इमारतीच्या पुनर्विकासासाठीचा हिरवा कंदील सहा महिन्यांपूर्वीच दाखवला होता. मात्र याबाबत कारवाई होत नव्हती. त्यामुळे १३६ कुटुंबांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या पालिका प्रशासनाला पत्र देऊन पालिका मुख्यालयासमोर उपोषणचा इशारा नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला होता.

गृहसंस्थेची दुरवस्था

नेरुळ सेक्टर सहा येथील दत्तगुरू सोसायटीची दुरवस्था झाली आहे. वारंवार या इमारतीत पडझडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ही धोकादायक इमारत कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याबाबत नवी मुंबई पालिकेकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे  लक्ष दिलेले नव्हते.

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्वकिासासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून ११ मीटरचा रस्ता दोन्ही बाजूने वाढवून १५ मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीच्या शेजारीच असलेले मार्केट निष्कसित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यालाही महासभेची मंजुरी मिळाली आहे. आता सिडकोने येथील मार्केटचा भूखंड सोसायटीला हस्तांतरित केल्यानंतर महापालिका गृहसंस्थेच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी देईल.  -रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका