नवी मुंबई : धोकादायक असणाऱ्या गृह निर्माण संकुल पुनर्विकास प्रकरणी पदाधिकाऱ्याकडून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सिडकोच्या तीन कर्मचाऱ्यांसह चौघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केली आहे. सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या उद्वाहन जवळ या लाचखोरांना पकडल्यानंतर लाच लुचापत अधिकाऱ्यांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांचीही कसून चौकशी केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरोपींमध्ये कार्यालयीन सहाय्यक राहुल कांबळे, सहकार अधिकारी तानाजी काळोखे, शिपाई महेश कामोठकर आणि खासगी इसम किशोर मोरे यांचा समावेश आहे. वाशी येथील एका गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करण्यासाठी या चौघांनी गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर हा सौदा साडेतीन लाख रुपयांवर ठरला.

गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांनी या लाचकोरीची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाभोवती सापळा रचला. लिफ्ट जवळ पैसे घेत असताना राहुल कांबळे आणि महेश कामोटकर यांच्यावर झडप घातली. कसून चौकशी केल्यानंतर तानाजी काळोखे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उपनिबंधक प्रताप पाटील यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तक्रारदार यांचे त्यांच्याशी कधी संभाषण झाले नाही. संशयित आरोपी आणि पाटील यांचाही लाचखोरी प्रकरणी संपर्क झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे. या लाचखोरीमुळे सिडकोच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.