रबाळे
शेती करून शांतपणे उदरनिर्वाह करणारे, गावदेवी आणि हनुमान या गावातील श्रद्धास्थानांना जपणारे आणि विस्तीर्ण तलावाचे सान्निध्य लाभलेले राबाडा काळाच्या ओघात रबाळे झाले. सिडको, एमआयडीसीच्या आगमनाने या गावाचे रूपडे पालटले. भूसंपादनात शेती गेली आणि शहरीकरणाचे भले-वाईट परिणाम आजूबाजूच्या गावांप्रमाणेच रबाळेवरही झाले.
चारही बाजूंनी शेकडो एकर शेतजमीन असलेले रबाळे गाव एके काळी शेतीप्रधान गाव म्हणून ओळखले जात असे. एमआयडीसी आणि सिडकोने या गावाची जमिनी संपादित केल्या आणि कोळी, कुंभार, दलित लोकवस्ती असलेल्या या गावाच्या चारही बाजूंनी नागरी वसाहती उभ्या राहिल्या.
पूर्वी गावाच्या पूर्वेला बारा एकरांवर विस्र्तीण तलाव होता. हे या गावाचे एक खास आर्कषण होते. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या रुंदीकरणात आणि रेल्वेमार्गामुळे या तलावाचा ७५ टक्के भाग बुजवला गेला. गावाचे रबाळे हे नामकरण सिडकोच्या आगमानानंतर झाले. ग्रामस्थ आजही या गावाला राबाडा असेच संबोधतात आणि तेच या गावाचे मूळ नाव आहे. राबाडा हे नाव कशावरून पडले हे गावातील जुन्या जाणत्या ग्रामस्थांनाही सांगता येत नाही, पण रबाळे एमआयडीसी, रबाळे रेल्वे स्थानक यामुळे या छोटय़ाशा गावाला आता देशाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
समुद्र, खाडी किंवा मासेमारीशी सुतराम संबंध नसलेल्या या गावात अपवाद वगळता सगळीच कोळी वस्ती होती, यावर कोणाचा विश्वास नाही. चार पाटील आणि तीन कुंभारवाडय़ांतील कुंभार यांच्या कुटुंब विस्तारातून हे गाव निर्माण झाले. पूर्वेस विस्र्तीण तलाव, सुलाई देवीचा डोंगर; पश्चिमेस गोठविली गाव आणि त्याच्या मधल्या भागात दूपर्यंत पसरलेली हिरवीगार शेतजमीन. दक्षिण बाजूस तळवली गावाची सीमा आणि उत्तर बाजूस ऐरोली गावाची शेतजमीन त्यामुळे शेती हेच इथले उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते.
गावातील सुमारे ८०० एकर जमीन सिडको व एमआयडीसीने आपापल्या प्रकल्पांसाठी संपादित केली. त्यामुळे ग्रामस्थांना साडेबारा टक्के योजनेंर्तगत चांगला मोबदला मिळाला, पण त्यामुळे ग्रामस्थ भूमिहीन झाले. काही ग्रामस्थांनी समोरच्या कारखान्यांत नोकऱ्या पत्करल्या तर काही जणांनी स्वयंरोजगार सुरू केले. याच गावाच्या पूर्वेस चांगो लक्ष्मण मढवी यांची हापूस आंब्याची बाग होती. नागरीकरणामुळे ही बाग नंतर नाहीशी झाली. चारही बाजूंनी असलेल्या शेतजमिनीमुळे जांभूळ, बोरं, आंबा, चिंचा यांची मुबलक झाडे या परिसरात होती. सिडकोने सुरू केलेल्या पहिल्या बीएमटीसी बससेवेसाठी पहिले बस आगार याच गावाच्या उत्तर बाजूस बांधण्यात आले. त्या ठिकाणी बीएमटीसीच्या शेकडो बसेसची दुरुस्ती आणि परिचलन केले जात असे.
ही जागा आता नवी मुंबई महापालिकेच्या पदरात पडली आहे. त्यामुळे त्याचा वाणिज्य विकास करण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. मारुती सीताराम पाटील हे गावचे पहिले संरपंच. त्यांच्यापासूनच गावातील राजकारणाला सुरुवात झाली. फार पूर्वी हनुमान मंदिरात भरणारी शाळा हीच काय ती गावातील शिक्षणाची संधी होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ठाणे किंवा घणसोली हेच पर्याय होते. हनुमान मंदिराच्या जीर्णोद्वारावरून गोठवली गावातील ग्रामस्थांबरोबचा झालेल्या संघर्षांचा अपवाद वगळता हे गाव तसे शांत आणि संयमी म्हणूनच ओळखले जाते.
हनुमानाची कथा आणि गावदेवी मंदिर
गावात हनुमान मंदिर व गावदेवी अशी दोन श्रद्धास्थाने आहेत. चैत्र पौर्णिमेला होणारी जत्रा आणि हनुमान जयंती हे गावाचे दोन मोठे उत्सव. या गावातील हनुमान गोठवली ग्रामस्थांनी त्यांच्या गावात नेल्याचा आरोप आजही ग्रामस्थ करतात. गावाच्या वेशीवर असलेल्या हनुमान मंदिराची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने गोठवली ग्रामस्थांनी तो हनुमान आपल्या गावाच्या संरक्षणासाठी वाजत-गाजत नेल्याचे गोठवलीकर सांगतात. गावदेवीचे मंदिर आजही ठाणे-बेलापूर मार्गावर असणाऱ्या रबाळे तलावाच्या पूर्वेस आहे. ग्रामस्थ शुभकार्याची सुरुवात या देवीच्या दर्शनाने करतात. पावसाळ्यात हे मंदिर तलावातील पाण्यात जाते
डॉक्टरांचे गाव
बेलापूर पट्टय़ात ५० वर्षांपूर्वी डॉक्टर शोधून सापडत नसे. उपचारांअभावी अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे ठाण्याहून डॉ. साखळकर सायकल चालवत रबाळेत येत. गावाच्या वेशीवर असलेल्या एका छोटय़ा जागेत उपचार करत. त्यामुळे ते या गावातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती ठरले होते. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. साखळकरांकडून उपचार करून घेण्यासाठी रुग्ण थेट बेलापूरहून पायी येत. त्यामुळे डॉक्टरांचे गाव या नावानेही रबाळे ओळखले जाऊ लागले. नंतर डॉ. साखळकर रबाळेवासी झाले.
