Amit Thackeray : मुंबईच्या नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यासह जवळपास ७० मनसैनिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दरम्यान, यावरून नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

अमित ठाकरे काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत मी त्यांना (गजानन काळे) विचारलं की जर मी उद्घाटन केलं तर काय होईल? तर ते बोलले की केस (गुन्हा दाखल) होईल. मग मी बोललो की जर महाराजांसाठी केस झाली तर अडचण काय? मग आजच उद्घाटन करून टाकू ना? आपण जर अल्टिमेटम दिला तर पुन्हा पोलीस बंदोबस्त असेल. त्यामुळे आपण उद्घाटन करून टाकू आणि आम्ही उद्घाटन केलं. आमच्यावर गुन्हा दाखल झाला, महाराजांसाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला बरं वाटलं”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“आदित्य ठाकरे यांनी माझ्यासाठी एक पोस्ट केली त्यामुळे त्यांचेही आभार, खरं तर महाराजांसाठी प्रत्येक माणूस हा पेटून उठतो. त्यामध्ये आपण राजकारण करत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण चार महिने का रखडलं हे मलाही कळलं नाही. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे अनेक ठिकाणी गेले, अनेक पक्ष प्रवेशासाठी गेले, मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नव्हता का? मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही एवढे दिवस अनावरण करणार नाही का? माझा प्रश्न हाच आहे की चार महिने अनावरण का रखडलं? तुम्हाला वेळ नसेल तर दुसरे कोणाला पाठवा”, असं म्हणत अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! ४ महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी”, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.