तीन नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन
उरण तालुक्यातील वाढते अपघात, वाहतूक कोंडी तसेच सुसज्ज रुग्णालयाअभावी रुग्णांचे होणारे हाल या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उरण सामाजिक संस्थेने करळ फाटा येथे ३ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. फुंडे विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या संस्थेच्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली. या समस्यांना जबाबदार असलेल्या जेएनपीटी, सिडको, सार्वजनिक बांधकाम खाते, आर.टी.ओ. तसेच राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाविरोधात हे आंदोलन असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
या पाश्र्वभूमीवर जनजागृती करून हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष भूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव संतोष पवार, दिनेश घरत यांनी केले आहे. यासाठी वेळ पडल्यास जनहित याचिका दाखल करून संबंधित आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचाही संस्थेचा विचार आहे.

अवजड वाहनांना रस्ते नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले
उरण परिसरात जेएनपीटी बंदराची निर्मिती होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत. सुरुवातीला १ लाख कंटेनरची हाताळणी करणारे हे बंदर सध्या ४५ लाखांपेक्षा अधिक कंटेनरची हाताळणी करीत आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत हजारोंच्या पटीत वाढ झाली आहे. या अवजड वाहनांच्या वाहतुकीला साजेसे रस्ते नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक नागरिकांना जीव गमवावे लागत आहेत. दुसरीकडे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जासई नाका, गव्हाण फाटा तसेच करळ फाटा येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. उरणमधून मुंबई, नवी मुंबई किंवा इतर ठिकाणी ये-जा करणाऱ्या कामगार, कर्मचारी, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी उरण परिसरात एकही अत्याधुनिक रुग्णालय नसल्याने उपचारांअभावी अनेक जखमींचा मृत्यू होतो.