नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात करोना संसर्ग टाळण्यासाठी शेतमालाची आवक निम्म्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल-मे महिन्यात बाजार शुल्क उत्पन्नात सरासरी नऊ कोटी रुपयांनी घट झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार संसर्गाचा स्रोत समजला जात आहे. याच भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू नियमावलीअंतर्गत सुरक्षित अंतराचा नियम आणि गर्दीवर नियंत्रण ठेवून बाजार समितीतील व्यवहार सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे शेतमालाची आवक मर्यादित ठेवण्यात आली. निम्म्या संख्येने शेतमालाची वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे आवक कमी झाली. त्याचा परिणाम बाजार शुल्कावर झाला. बाजारात एप्रिल व मे २०१९ मध्ये अनुक्रमे पाच कोटी ७१ लाख आणि सात कोटी रुपयेउत्पन्न मिळाले होते. एप्रिल २०२० मध्ये हे उत्पन्न एक कोटी ९६ लाख तर मे २०२०ला २ कोटी ९०लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यात नऊ कोटी रुपयांची घट आहे.
फळ बाजारात मागील वर्षी एक कोटीहून अधिक तर या वेळी ४०लाख रु., भाजीपाला बाजारात गेल्या वर्षी ६०लाख रु तर या वेळी अवघे ६ लाख रु. तसेच मसाला बाजारात २०१९ला एक कोटी तर या वेळी निम्म्यावर उत्पन्न आल्याची माहिती मुंबई कृषी बाजार उत्पन्न समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी दिली.