नवी मुंबई : सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी १ लाख ६० हजारांवर अर्ज करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ हजार अर्जदारांनीच या योजनेत अनामत रक्कम सिडकोकडे जमा केली आहे. या सोडतीसाठी चौथ्यांदा दिलेल्या मुदतवाढीनुसार तीन दिवस शिल्लक आहेत.

सिडकोने गेल्या वर्षी दसऱ्याला २६ हजार घरांसाठी सोडत काढली. यामध्ये खारघर रेल्वेस्थानकालगतचे घर १ कोटी ७ लाख रुपयांना आणि वाशी येथील घर ७९ लाख ५८ हजारांना विक्रीस उपलब्ध केले. घरांच्या किमती परवडणाऱ्या नसल्याने निम्म्यापेक्षा अधिक अर्जदारांनी नोंदणीसाठी अडीचशे रुपयांचे शुल्कसुद्धा भरले नाही. १७ जानेवारीपर्यंत ११ हजार अर्जदारांनीच अनामत रक्कम भरली होती. नंतर ११ दिवसांत आणखी ४ हजार अर्जदारांनीच ही रक्कम भरली. पुढील तीन दिवसांत किती अर्जदार अनामत रक्कम भरतात यावर सिडको महामंडळाच्या ‘पसंतीच्या घराच्या’ सोडतीचे भवितव्य ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्लक घरांच्या संख्येत वाढ?

४२ हजार घरे विक्रीविना शिल्लक असून ही संख्या ५५ हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचे सिडकोच्या एका उच्चपदस्थ व्यक्तीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाकडे संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.