पनवेल, पेण व उरणमध्ये ‘श्रीं’च्या मिरवणुकांचा जल्लोष
संकष्ट चतुर्थी अर्थात साखरचौथ गणेशोत्सव पनवेल तालुक्यात सुरू होत आहे. येत्या २८ सप्टेंबरला गणराय मखरात विराजमान होतील. रायगड जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात हा सोहळा मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. ढोल-ताशांच्या गजरात ‘श्रीं’च्या मूर्ती आणल्या जातात. बुधवारी काही मंडळांनी गौरीसह गणेशमूर्ती मिरवणुकीने मंडपात आणल्या. पनवेल परिसरात दोन दिवस मिरवणुकांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर चार दिवसांनी साखर चतुर्थीला गणरायाचे आगमन होते.
पेण, उरण आणि पनवेलमधील आगरी समाजात प्रामुख्याने साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. दशकभरापासून या तीन तालुक्यांत या सोहळ्याची व्याप्ती वाढल्याचे मूर्तीकार सांगितले.
जिल्ह्यात नवसाचे गणपती साखर चौथ संकष्टीनिमित्त बसवले जातात. याचवेळी २१ दिवसांचे गणपतीही या उत्सवात असतात. पनवेल शहरात एकूण ६८ साखरचौथ गणपती आहेत. २२ सार्वजनिक मंडळे आहेत. आकर्षक मूर्ती, नेत्रदीपक आरास ही या उत्सवाची वैशिष्टय़े आहेत. गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना शुक्रवारी, २८ सप्टेंबरला होणार आहे. पनवेल तालुक्यात संबंधित साखरचौथीला बसणाऱ्या गणपतीना गौरा गणपती असेही संबोधले जाते.
सार्वजनिकमंडळांचाही गणपती
अनंत चतुर्दशीनंतर येणारी चतुर्थी. या दिवशी सकाळी वाजत गाजत गणरायाला आणले जाते आणि दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. दीड, अडीच ते पाच दिवस संबंधित गणपती बसविले जातात. साखर चौथ हे एक व्रत आहे, घरोघरी चतुर्थी पुजली जाते मात्र साखरचौथ गणपती पेण, पनवेल आणि उरण तालुक्यांत बसविले जातात. काही सार्वजनिक गणेशमंडळेही या गणपतींची प्रतिष्ठापना करीत असल्याचे जीवन म्हात्रे यांनी सांगितले.