कस्तुरी सहकारी गृहनिर्माण संस्था (मोराज रेसिडन्सी) पामबीच, सानपाडा

नवी मुंबईची लोकसंख्या मागील दहा ते १२ वर्षांत झपाटय़ाने वाढत गेली आणि टोलेजंग इमारतीही वाढल्या. त्यासोबत मॉल उभारले गेले; परंतु पामबिच मार्गाच्या सुरुवातीलाच एका कोपऱ्यात दिमाखाने उभी असलेली ‘मोराज रेसिडन्सी’ आजही अनेकांना आकर्षित करते. पामबीच मार्गावर २४ तास सुरू असलेली वाहनांची वर्दळ, परिसरात वाढलेली गजबज यांतून पुढे जाऊन ‘मोराज रेसिडन्सी’मध्ये प्रवेश करताच बाहेरचा कोलाहल कुठल्या कुठे पळून जातो आणि तेथील शांततेने मन स्वच्छ होऊन जाते.

वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर ‘मोराज’ दृष्टीस पडते. पामबीचसारखा लांबसरळ रस्ता बाजूला. रहिवाशांची अधूनमधून ये-जा. बाकी साऱ्या वातावरणात शांतता भरून राहिलेली. सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडावर ही इमारत २००० साली उभारण्यास आरंभ झाला. व्यावसायिक अश्विन व्होरा, भूपेंद्र शहा, मोहन गुरनाणी यांनी ही जागा विकासासाठी ताब्यात घेतली. या जागेवर ३१ इमारती उभ्या आहेत. इमारतीत जागेचा विस्तार असल्याने आणि त्यात त्या नियोजनबद्ध बांधण्यात आल्याने त्या सुटसुटीत आहेत.

२००३ मध्ये हा गृहप्रकल्प पूर्णत्वास आला. संस्थेत एकूण ८४४ सदनिका आहेत, तर ६९ व्यावसायिक गाळे आहेत. अर्थात या संस्थेत सर्वधर्मसमभाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. इमारतीतील प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होणे, हे येथील सर्वाचे वैशिष्टय़. संस्थेच्या आवारात दहीहंडी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महिला दिन तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. महिला दिनी प्रोत्साहनपर सामाजिक उपक्रम राबवले जातात.

सोसायटी परिसरात ऐसपैस जागा असल्याने सुट्टीच्या दिवसात मुलांचे मैदानी खेळही रंगतात. लहान मुलांसाठी येथे उद्यानाची सोय आहे. गृहसंकुलात मंदिर ही संकल्पना आधीपासूनच या संस्थेने अमलात आणली. संकुलात गणेश मंदिर आहे. संकष्टी चतुर्थीला साग्रसंगीत पूजा आणि गणेशस्तोत्र पठणाचे कार्यक्रम होतात. आवारात समाज सभागृह आहे. याशिवाय जलतरण तलाव यासारख्या सुविधा आहेत. संस्थेच्या  आवारात अशोका, नारळ, वड, अंजीर, पपई, पाम ट्री आदी प्रकारचे वृक्ष आहेत.

खाडीनजीकच्या परिसरात पूर्वी लोक घर घेण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. दळणवळणांच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थाही सुरळीत नव्हती. आजघडीला ‘मोराज’ ही ‘लॅण्डमार्क’ इमारत म्हणून उभी आहे. संस्थेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांचा पहारा आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात सौरऊर्जेवर चालणारे उद्वाहन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संस्थेत वर्षांतून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येते. त्यात सर्व जण उत्स्फूर्त सहभागी होता. संस्थेचे कामकाज हे शासकीय कार्यालयासारखे चालते. संस्थेतील ३१ इमारती डायमंड, नीलरत्न, रुबी अशा अलंकारी नावाने सजल्या आहेत. या संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झाले आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्यात आल्याचे अध्यक्ष गुलाब हांडे यांनी सांगितले.

आरोग्याच्या दृष्टीने संस्थेत कीटकनाशक रसायनांची फवारणी केली जाते. याशिवाय वैद्यकीय तपासणी शिबिरेही घेतली जातात, असे संस्थेचे सचिव जी. जी. बनसोडे यांनी स्पष्ट केले.

पाण्याची सुविधा उत्तम

संस्थेत पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित होण्यासाठी दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोज पाण्याची जलमापकांमधील नोंद घेण्यात येते. यात काही ठिकाणी जलमापके जास्तीचे आकडे दाखवत असल्यास पालिका अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासणी केली जाते. दर सहा महिन्यांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जातात. गेल्या सहा महिन्यांत संस्थेतील रहिवाशांना पाण्याचा तुटवडा कधी भासला नाही.

समाजमाध्यमांचा वापर

मोराज रेसिडन्सी सोशल मिडियचा पूर्णपणे वापर करून कामकाजात पारदर्शकता ठेवते. संस्थेचे संकेतस्थळ, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप यासारख्या समाजमाध्यमांचा वापर करून रहिवाशांशी संपर्क साधला जातो. संस्थेची मुख्य समिती आहे. ३१ इमारतींसाठी वेगेवेगळे पदाधिकारी नेमले आहे. त्याची मासिक सभा होते. कमिटीतील सदस्यांना कामे वाटून देण्यात आली आहेत.

पार्किगची व्यवस्था

संस्थेत स्ट्रील पार्किंग आणि ओपन पार्किग अशी आहे. वाहने पार्क करण्याचे नाममात्र शुल्क आकारण्यात येते. वाहनाला स्ट्रीकर देण्यात आली आहेत. ज्या वाहनांवर सोसायटीचे स्ट्रीकर चिटकवले असेल त्यांनाच प्रवेश दिला जातो. दुसऱ्याच्या पार्किंगच्या जागेत वाहन उभे केल्यास त्याला ‘चिमटा’ लावण्यात येतो आणि संबंधित चालकांकडून दंड वसूल केला जातो.  घरटी वाहनांची संख्या वाढू लागल्याने वाहनतळासाठी येथील जागा अपुरी पडू लागली आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी येथील कार्यकारिणीचे प्रयत्न सुरू असल्याचे सहसचिव देवेंद्र खांडे यांनी सांगितले. दैनंदिन गरज असलेल्या भाजीपाल्यासाठी रहिवाशांची पायपीट होऊ नये म्हणून सोसायटीच्या प्रवेशद्वारावर नाममात्र शुल्कात फेरीवाल्यांना परवानगी दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक काम

सोसयटीमध्ये राहत असणारे सहाय्यक पोलीस उपआयुक्त सुभाष ढवळे यांची चंद्रपुर मध्ये बदली झाल्यांनतर त्यांनी नक्षलग्रस्त भागातील आदिवासींच्या मदतीसाठी सोसायटीतील रहिवाशांना साद घातली. त्यावेळी सर्वच रहिवाशांनी जुने कपडे, भांडी, वस्तू देऊन ढवळे यांच्या या उपक्रमाला मदत केली. भविष्यात वाडा, मोकाडा, जव्हार भागामध्ये देखील सामाजिक कार्य करण्याचे सोसायटीचे उद्देश आहे.

मलनिस्सारणाची समस्या

‘मोराज’ची उभारणी झाली तेव्हा हा परिसर खाडीमय होता. पालिकेने कालांतराने येथे मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या. मात्र, या वाहिन्या उंचावर असल्याने सोसायटीत मलनिस्सारणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सोसायटीतील जुने पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने रहिवाशांना त्रास होत होता. तेथे आता नवीन पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे.

आवाहन

तुमचेही गृहसंकुल, सहकारी गृहनिर्माण संस्था, सोसायटी अशीच वैशिष्टपूर्ण आहेत? तुमच्या गृहसंकुलाविषयीची थोडक्यात माहिती आम्हाला कळवा. ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये अशा गृहसंकुलांना ‘कुटुंबसंकुल’ या सदरातून प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता

लोकसत्ता, ईएल-१३८, टीटीसी इंडस्टीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०

ईमेल: mahamumbainews@gmail.com