उद्योजक : विशाल पाटील
देशात उंच इमारतींच्या बांधकामासाठी पूर्वी बांबूंची परांची वापरली जात असे. ऐंशीच्या दशकात नवी मुंबईतील एका तरुणाने नोसिल कंपनीतील लोखंडी परांचीचा अभ्यास केला आणि याच व्यवसायाला आकार देण्याचा निर्णय घेतला. आज आरएनपी स्कॅफोल्डिंगचे पुणे, बंगळूरु, हैदराबाद, विशाखापट्टणम् या शहरांत चार कारखाने आहेत. देश-विदेशांत या परांच्यांचा पुरवठा केला जातो. आरएनपीचे व्यवस्थापकीय संचालक विशाल पाटील यांनी आरएनपीची जन्मकथा सांगितली..
गगनचुंबी इमारती बांधताना लाकडी परांचीवर चढून काम करणाऱ्यांचे जीव जाण्याचे प्रकार पूर्वी वारंवार घडत. सत्तरच्या दशकात काही बडय़ा कारखान्यांच्या उभारणीत परदेशी तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. सुरक्षेच्या दृष्टीने रासायनिक कारखान्यांची डागडुजी आणि देखभालीसाठी लोखंडी परांची वापरल्या जाऊ लागल्या. ऐंशीच्या दशकात नवी मुंबईतील एका तरुणाने नोसिल कंपनीतील या परांचींचा अभ्यास केला आणि स्थापना झाली, आरएनपी स्कॅफोल्डिंगची.
साठच्या दशकात राज्यात अनेक रासायनिक कारखान्यांची स्थापना झाली. नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक पट्टा तर रासायनिक कारखान्यांसाठीच निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे शिरवणे येथील ‘हार्डिलिया’ या पहिल्या रासायनिक कारखान्यानंतर घणसोली येथे मफतलाल समूहाच्या ‘नोसिल’ या रासायनिक कंपनीने बांधकामाला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावांतील तरुण या कारखान्यात नोकरीसाठी अर्ज करत होते. तेव्हाच तळवली गावातील एका तरुणाने ‘नोसिल’मध्ये कच्चा माल पुरवठा करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांचे नाव रमेश पाटील त्यात रंगकाम आणि देखभालीसाठी लागणाऱ्या मालाचा समावेश होता. कामानिमित्त त्यांचा कारखान्यातील वावर वाढला आणि त्यांनी कारखाना उभारताना बांधलेल्या लोखंडी परांच्या पाहिल्या आणि त्याच दिवशी लोखंडी परांच्याचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिवसाला २० मेट्रिक टन उत्पादन या महापे येथील कारखान्यात केले जात आहे. हा उद्योग त्यांच्या दुसऱ्या पिढीने देशातील अनेक बडय़ा शहरांत सुरू केला आहे. नोसिलमधील प्रवेशामुळे नंतर एचपीसीएल, बीपीसील, रिलायन्स या कंपनीतील प्रवेश त्यांच्यासाठी सुकर झाला. रासायनिक कारखान्यांपुरते मर्यादित असलेला हा उद्योग आता बांधकाम क्षेत्रात स्थिरावला आहे.
देश-विदेशात होणारा परांचींचा पुरवठा आणि गुणवत्ता सांभाळण्यासाठी आरएनपीच्या ताफ्यात आता २०० कार्यालयीन कर्मचारी आहेत. प्रॉडक्ट, प्राइज, प्लेसमेंट आणि प्रमोशन या चार ‘पी’वर लक्ष केंद्रित करून सर्व व्यवसायांचा विस्तार करण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. परांचींव्यतिरिक्त खाद्यपदार्थामधील विक्री आणि तयार सिमेंटक्राँक्रीट पुरवठा करण्याचे कारखानेदेखील आरएनपीच्या नावावर आहेत. एका उद्योगावर अवलंबून न राहता अनेक उद्योगांचा विस्तार करण्याचे ध्येय आरएनपी समूहाने समोर ठेवले आहे. त्यांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साचे बनवण्याचे काम
उंच इमारतींसाठी लागणारे फॉर्मवर्क, कॉलम स्लॅब, आणि प्री-कास्टसाठी लाखणारे साचे बनविण्याचे कामही आता आरएनपीच्या कारखान्यातून होऊ लागले आहेत. या कामासाठी लागणारे कॅपलॉकही आता आरएनपी बनवू लागली आहे. शहरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामात या प्री-कास्ट साच्यांचा वापर केला जात आहे. त्यासाठी पाचशेपेक्षा जास्त कामगार दिवसरात्र या कारखान्यातून या परांच्या बनविण्यात गुंतलेले असतात.