वीर सावरकर उद्यान, वाशी सेक्टर-८

गजबजलेल्या वाशीतील निवांत कोपरा म्हणजे वीर सावरकर उद्यान. वृक्ष आणि हिरवळीच्या आगळ्या वेगळ्या रचनांमुळे हे उद्यान प्रेक्षणीय ठरते. मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी, मुलांना खेळता यावे म्हणून, निवांतपणे वाचन करण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी अशा अनेक निमित्तांनी परिसरातील रहिवाशांची पावले या उद्यनाकडे वळतात.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वाशी येथील वीर सावरकर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. या उद्यानात वड आणि नारळाची अनेक झाडे आहेत. त्यामुळे तिथे नेहमीच सुखद गारवा असतो. उद्यनाच्या मधोमध वडाचे झाड असून ते जवळपास ४० वर्षांपूर्वीचे आहे, असे येथे फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक सांगतात. या वडाच्या पारंब्यांवर लहान मुले झोके घेतात.

उद्यनात पहाटे पाचपासूनच फेरफटका मारणाऱ्यांची वर्दळ सुरू होते. उद्यान अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्यामुळे मन प्रसन्न होते. उद्यानात चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यावर आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक आणि कल्पक खेळणी आहेत. त्यामुळे सकाळी अनेक आई-बाबा आपल्या मुलांना येथे खेळायला घेऊन येतात. त्यांचाही व्यायाम होतो आणि मुलांना मोकळ्या हवेत खेळता येते.

या उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील पहिली खुली व्यायामशाळा साकरण्यात आली. या व्यायामशाळेत सर्व वयोगटांतील व्यक्ती व्यायाम करताना दिसतात. उद्यनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. शौचालयाची सोय आहे. व्यायाम करून थकल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी सुविधा आहे.

उद्यान आकर्षक असल्यामुळे तिथे महाविद्यलयातील तरुणांचे घोळके सेल्फी काढण्यात मग्न झालेले दिसतात. त्यांच्या गप्पा रंगतात. संध्याकाळी आई-बाबा किंवा आजी-आजोबांबरोबर अनेक  लहान मुले इथे येतात. त्यांच्या किलबिलाटाने उद्यन गजबजून जाते. मोकळ्या हवेमुळे मन प्रसन्न होते.  सकाळी मॉर्निग वॉक झाल्यांनतर नागरिक दुर्वा नेतात. उद्यानातील पक्ष्यांचा किलबिलाट मनाला समाधान देतो. नाराळाची झाडेदेखील एका रांगेत लावण्यात आली आहेत. त्यामुळे ती आकर्षक दिसतात. गवती चहा, तुळशीची बागदेखील या उद्यानात आहे. गुलमोहराची झाडेही मोठय़ा प्रमाणात आहेत.

सकाळी चालल्यांनतर दिवसभर मन प्रसन्न राहते. या नित्यक्रमामुळे लवकर उठण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आळस दूर होतो. काम करण्यास ऊर्जा मिळते.

सूरज भांडे, विद्यार्थी

या उद्यनात मी योगासने करण्यासाठी येते. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते. काम करण्याची ऊर्जा मिळते. येथे आल्यामुळे अनेकांशी स्नेहसंबंध जोडले गेले आहेत. त्याचाही आनंद होतो. सकाळी चालण्यासाठी पावले आपोआप उद्यनाकडे वळतात.

प्रदीप बोरकर, नागरिक