देवनार, कांजूरमार्ग, मुलुंड येथील मुंबई पालिकेच्या कचरा क्षेपणभूमीला अधूनमधून लागणाऱ्या आगीमुळे नवी मुंबईतील अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे मंगळवारी डॉक्टरांनी सांगितले. नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांधकामे, तसेच दगडखाणी असल्याने प्रदूषणाची मात्रा जास्त असून ही संख्या चिंताजनक असल्याचे या डॉक्टरांचे मत आहे. मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो.
धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सिमेंटचे जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत प्रदूषणाची कमी नाही. गेली अनेक वर्षे पूर्व बाजूस दगडखाणींनी पोखरलेले डोंगर, रासायनिक कारखाने आणि आता मुंबईत असणाऱ्या क्षेपणभूमीवर वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नवी मुंबईत अस्थमा रुग्णांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात लहान मुलांचा जास्त समावेश असल्याचे मत डॉ. अभय उपे यांनी व्यक्त केले आहे. अस्थमामुळे श्वास घेण्यास त्रास होत असून छातीवर वजन पडल्यासारखा भास होत असतो. पंधरा वर्षांपूर्वी अडीच टक्के असणारे अस्थमा अर्थात दम्याचे प्रमाण आता १५ टक्यांवर आले असून चार वर्षांत हा देश अस्थमा रुग्णांबाबत राजधानी ठरणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या खाडीकिनारी असलेली देवनार, कांजूरमार्ग, मुलुंड या क्षेपणभूमीतील दरुगधी तर कोपरखैरणे, ऐरोली येथील नागरिकांना नेहमीच सहन करावी लागत आहे.
अलीकडे देवनार क्षेपणभूमीत दोन वेळा लागलेल्या मोठय़ा आगींमुळे नवी मुंबईत धुराचे लोट पसरले होते. यामुळे अगोदरच अस्थमाची लक्षणे असलेल्या रुग्णांत लागलीच या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मुंबई क्षेपणभूमीत लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्याकरिता येथील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asthma patients increased by deonar fire
First published on: 04-05-2016 at 00:36 IST