उरणमधील वकिलांकडून जनजागरण रॅली 
कौटुंबिक वाद न्यायालयापर्यंत पोहोचल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत वाद मिटवावेत, असा संदेश देत उरण न्यायालयातील वकिलांनी सोमवारी दिला. या जनजागृतीसाठी उरण शहरातील मुख्य रस्त्यातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली तसेच नाक्यानाक्यावर पथनाटय़ सादर करण्यात आली.
न्यायालयात प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेले खटले लोकअदालत भरवून निकालात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच्या पुढील पायरी म्हणून उरण बार असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात उरणमधील पेन्शनर्स पार्क येथून करण्यात आली. वकिलांनी पथनाटय़ाच्या माध्यमातून न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे वाद कसे असतात त्याचा समाज आणि कुटुंबावर काय परिणाम होतो व ते टाळण्यासाठी काय करावे यावर यातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गणपती चौक तसेच इतर चौकात जाऊन हे पथनाटय़ सादर करण्यात आले. उरण न्यायालयातील वकिलांनी यामध्ये मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. या पथनाटय़ाचे लेखन उरण वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. पराग म्हात्रे यांनी केले होते. यावेळी रायगड जिल्हा सेवा प्राधिकरण सचिव व अलिबाग दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश आर.व्ही. उत्पात हेही उपस्थित होते. त्याचप्रमाणे उरण न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण व एस. एच. जैन तसेच ज्येष्ठ वकील अ‍ॅड. डी. के. पाटील, राजेंद्र भानुशालीही उपस्थित होते. यावेळी उरण तालुक्यातील गावागावांत जाऊन न्यायालयातील मध्यस्थी केंद्राचा लाभ घेण्यासाठी जनजागरण करणार असल्याचे उरण बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. किशोर ठाकूर यांनी सांगितले.