घाऊक बाजारात २० ते ५० रुपये किलोने विक्री
रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातील आंब्याबरोबरच तोतापुरी आणि आंध्र प्रदेशातील बदामी आंब्यांचे वाशी बाजारात आगमन झाले आहे. आकाराने मोठय़ा आणि चवीला गोड असणाऱ्या या आंब्याला चांगली मागणी आहे. घाऊक बाजारपेठेत बदामी आंब्याची विक्री ३० ते ५० रुपये व तोतापुरी आंब्याची विक्री २० ते ३० रुपये किलो दराने सुरू आहे.
यंदा देवगड हापूसचा हंगाम लवकर आणि जोरात सरू झाला आहे. त्यापाठोपाठ मद्रास हापूस देखील दाखल झाला आहे. फळांचा राजा जरी बाजारात भाव खात असला तरीही अद्याप तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. त्यामुळे ग्राहक त्याला स्वस्त पर्याय शोधत होते. या आठवडय़ात बदामी आणि तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाल्यामुळे हा पर्याय उपलब्ध झाला आहे. बाजारात एकूण ४८४५ क्विंटल आंब्याची आवक झाली आहे. दररोज देवगड, अलिबाग, रत्नागिरी हापूसच्या ३० हजार पेटय़ा येत आहेत तर बदामी आणि तोतापुरी आंब्याच्या १० टनाच्या ८ ते १० गाडय़ा येत आहेत.
मद्रास हापूसचा बाजारभाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटल तर देवगड आणि रत्नागिरीच्या हापूसचा ११ हजार ते १३ हजार रुपये आंबे बाजारात येऊ लागल्यामुळे त्यांचा एकमेकांच्या किमतीवर आणि मागणीवर परिमाण होत आहे. शिवाय ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जाण्याचीही शक्यता आहे. काही वेळा मद्रास हापूस हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. त्याचाही परिणाम आंब्याच्या किमतीवर होतो. त्यामुळे सध्या बाजारभावामध्ये बरेच चढ-उतार होत आहेत.
