पनवेल : रोडपाली येथे एका घरात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मतदेह सापडला असून ती बारबालेचे काम करीत होती. तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तो फरार आहे.

लिपी सागर शेख ऊर्फ रिना शेख असे मृत महिलेचे नाव असून ती मूळ बांगलादेशीय नागरिक आहे. दोन दिवसांपूर्वी तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली असता ही घटना उघडकीस आली. रिना ही मागील वर्षभरापासून या घरात राहत होती. बारबालेचे काम करीत होती, मात्र टाळेबंदीत ती बेरोजगार झाली होती. मागील २१ दिवसांपासून या घराला कुलूप होते. सोमवारी तिची मैत्रीण आल्यानंतर घराचे कुलूप उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप गुजर हे तपास करीत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन बांगलादेशीय महिलांना ताब्यात घेतले आहे.