नवी मुंबई : घरांच्या किमतीच्या बाबतीत नवी मुंबईतील महागडा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्सची भिकाऱ्यांच्या वस्तीमुळे बकालावस्था झाली आहे. सीवूड्स स्थानकाच्या पश्चिमेकडील पुलाच्या खालील पदपथांवर चक्क संसार मांडून बसलेल्या भिकाऱ्यांची दहशत इतकी वाढली आहे की, महापालिका आणि पोलीस यंत्रणाही त्यांच्यावर कारवाईस धजावत नसल्याचे चित्र आहे. अर्धनग्नावस्थेत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या, जुगार खेळणाऱ्या या भिकाऱ्यांचे आता रस्त्यावरच अश्लील वर्तन सुरू झाल्याने या भागातून मार्गक्रमण करणे लाजीरवाणे वाटू लागत असल्याचे नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
सीवूड्स हा नवी मुंबईतील आकर्षक परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी रेल्वे स्थानकावरच उभारण्यात आलेला टोलेजंग मॉल आणि व्यावसायिक संकुल त्याचे प्रमुख कारण आहे. मात्र, आता हा मॉल परिसरच संपूर्ण सीवूड्सला अवकळा आणू लागला आहे.मॉलच्या समोरील रस्त्यांवर एकमेकांना लागून असलेल्या खाद्यापदार्थ विक्रीची दुकाने आणि हॉटेले यांमुळे येथे नेहमीच नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून येथे भिकाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. अर्धनग्नावस्थेत फिरणारी लहान मुले, त्यांना भीक मागण्यास पिटाळून पदपथावरच फतकल मांडून बसलेल्या भिकारी महिला, तेथून जवळच असलेल्या मद्याविक्रीच्या दुकानाबाहेर रस्त्यावरच मद्यासेवन आणि गांजासेवन करत असलेले गर्दुल्ले असे चित्र या भागात दररोज संध्याकाळी पाहायला मिळते. गेल्या दोन महिन्यांपासून या टोळ्यांनी स्थानकालगतच्या पुलाखालील पदपथावर संसारच मांडला आहे. या पुलाशेजारूनच स्थानकाकडे प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र, आजूबाजूच्या वर्दळीची पर्वा न करता या पदपथावर भिकाऱ्यांच्या हाणामाऱ्या, शिवीगाळ, अश्लील वर्तन सुरू असते. सुमारे ५०हून अधिक भिकारी येथे ठाण मांडून आहेत. त्यातच पुलाच्या डावीकडील शौचालयालगतचा विस्तीर्ण पदपथही या भिकाऱ्यांनी आक्रमिला आहे.
‘सीवूड्स स्थानकाकडून नवीन ५० तसेच सेक्टर ४८ कडे जाणाऱ्या पदपथांवर रात्री आठनंतर भिकारी अस्ताव्यस्त झोपलेले असतात. तेथेच त्यांचा जुगाराचा अड्डा चालतो. नैसर्गिक विधीही तेथेच केले जातात. त्यामुळे येथून रात्री ये-जा करणे कठीण बनले आहे. महिलांसाठी तर हा परिसर असुरक्षित बनला आहे,’ अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक प्रसाद पदे यांनी दिली.
राजकीय पक्षांच्या पत्रांकडे दुर्लक्ष
भिकाऱ्यांच्या या उपद्रवाबाबत सीवूड्समधील काही राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी पालिका आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. ‘लोकसत्ता’नेही काही आठवड्यांपूर्वी याबाबत वृत्त दिले होते. त्या वेळी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी भिकाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या पथकाला पोलिसांची कुमक दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आजतगायत या भिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या पुलाखालीच वाहतूक पोलिसांची चौकीदेखील आहे. मात्र, रस्त्याच्या दुभाजकावर निर्धास्तपणे झोपणाऱ्या या भिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे शहाणपण पोलिसांना सुचलेले नाही.
पोलीस आयुक्तांच्या ताफ्याचाही कानाडोळा?
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे काही दिवसांपूर्वीच खासगी भेटीसाठी मॉल परिसरात आले होते. त्यांच्या या दौऱ्याच्या आधी पोलिसांनी परिसरात बेकायदा उभी करण्यात आलेली वाहने हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला होता. तसेच वाहतुकीचे नियमनही करण्यात येत होते. मात्र, त्या दिवशीही भिकाऱ्यांच्या टोळ्या अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर फिरत होत्या, असे या विभागातील एका नागरिकाने सांगितले.
यंत्रणांचे एकमेकांकडे बोट
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘हे भिक्षुक परिसरात दुर्गंधी पसरवत आहेत. मात्र, कारवाईसाठी पालिकेचे पथक गेले असता त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी टोळ्या धावतात. त्यामुळे पोलीस संरक्षणात कारवाई करण्यासाठी एनआरआय पोलिसांना सांगितले आहे.’ या संदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी सांगितले की, या भागाची पाहणी करून विभाग अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल. दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांना विचारणा केली असता त्यांनी ‘पालिकेकडून विचारणा होते, तेव्हा पोलिसांकडून सहकार्य केले जाते’, अशी प्रतिक्रिया दिली.