विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती उपलब्ध होण्यास अडचणी

नवी मुंबई महानगरपालिकांच्या शाळांत डिजिटल शिक्षणाबरोबर सर्व शाळेत जून महिन्यापासून विद्यार्थी व शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येत आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती अडचणीचीच ठरत आहे. याबाबत शाळांकडून अनेक तक्रारी येत आहेत.

पालिकेने आपल्या शाळांत अत्याधुनिक शिक्षणपद्धती उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल शिक्षणाची जोड दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, नियमित शाळेत हजेरी लावावी तसेच पालकांनादेखील आपल्या पाल्याची शाळेत उपस्थिती आहे की नाही हे समजावे यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. मात्र ही बायोमेट्रिक हजेरी लावताना विद्यार्थी व शिक्षकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी शाळांकडून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५३ प्राथमिक व १८ माध्यमिक आणि सीबीएससी शाळेत प्रत्येक वर्गखोलीच्या प्रवेशद्वारावर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. ती व्यवस्थित लावण्यात आली नाही. खिळ्यांमध्ये अडकवल्याने खाली पडण्याचे प्रकार घडत आहेत. ही यंत्रणा अधूनमधून नादुरुस्तही होत आहे. जर तांत्रिक बिघाड झाला तरच शिक्षण विभाग दुरुस्ती करून देते.मात्र यंत्रणा खाली पडून बिघडल्यास त्याचा भरुदड शाळेला सोसावा लागत आहे.

अनेक अडचणींमुळे ७० टक्केच बायोमेट्रिक हजेरी सुविधा सुरू आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद ऑनलाइन उपलब्ध होत नाही. संकेतस्थळावर ही माहिती दिसत नसल्याने शाळा प्रशासनाला हजेरी पुस्तकावरही नोंद घ्यावी लागत आहे.