बेलापूर मतदार संघ काबीज करण्यासाठी भाजपत प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा शेवटच्या क्षणी भाजपने पत्ता कापून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. पक्षाच्या या निर्णयाचे त्यांच्या सर्मथकांनी पेढे वाटून स्वागत केले. या सर्व खेळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा म्हात्रेंसाठीचा आग्रह महत्त्वाचा ठरला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. या सर्व खेळात संघाचे एक ‘प्रचारक गुरुजी’ यांच्या शब्दालाही महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.
देशात भाजपला आलेले अच्छे दिन बघून आमदार पुत्र संदीप नाईक यांच्या आग्रहास्तव माजी मंत्री गणेश नाईक यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधी संदीप नाईक यांनी मुंबईत भाजप प्रवेश केला होता. तेव्हापासून ऐरोली मतदार संघात संदीप नाईक व बेलापूरमध्ये गणेश नाईक यांना भाजप उमेदवारी देणार अशी अटकळ बांधली जात होती. या शक्यतेमुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पारा टिपेला गेला होता. नाईकांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेला आटापिटा पाहिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढण्यासाठी खास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पाठविले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा शांत राहा हा दिलेला सल्ला म्हात्रे यांनी तंतोतंत पाळताना नाईक प्रवेशाच्या वेळी व्यासपीठावर हजेरी लावली. महायुती होईपर्यंत नाईक यांनाच उमेदवारी मिळणार असे छातीछोकपणे सांगितले जात होते. त्यासाठी समाजमाध्यमांवर नाईक बेलापूरचे उमेदवार असा प्रचार देखील नाईक समर्थकांनी सुरू केला होता. त्या सर्व प्रचाराला मंगळवारी दुपारी पूर्णविराम मिळाला.
भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीतच म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचवेळी नाईक यांचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले. नाईक यांनी आपला भाजप प्रवेश हा राज्य पातळीवरून न करता देश पातळीवरील काही बडय़ा उद्योजकांच्या माध्यमातून केला होता. त्यामुळे त्याला एक वलय निर्माण झाले होते.
नाईकांच्या भाजप प्रवेशासाठी केंद्रीय मंत्री नवी मुंबईत येणार होते पण त्यांच्या वेळा जुळून न आल्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. त्यावेळी नाईकांवर आमचा क्रित्येक दिवस डोळा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यावेळीही नाईकांची उमेदवारी पक्की समजले जात होती, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हात्रे यांना शब्द दिला होता.
त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपली पत पणाला लावली होती. मुख्यमंत्र्यांकडे गणेशोत्सवासाठी गेलेल्या म्हात्रे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अशीष शेलार यांच्या समोर आपला मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांवर उमेदवारीचे सोपविले होते. याशिवाय संघातील काही जुन्यजाणत्या प्रचारकांनी त्यांच्यासाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे. नाईक यांचा पत्ता कापला जावा यासाठी नवी मुंबईतील काही व्यापारी, विकासक यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.