बंगल्याच्या बांधकामातील अनियमिततेतील दुरुस्ती प्रकरण

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सीबीडी येथील गौरव बंगल्याला पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नोटीस दिली आहे. हा बंगला म्हात्रे यांचा मुलगा माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे याच्या नावावर आहे. या संदर्भात एक याचिका गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या वेळी बंगल्याच्या बांधकामात झालेली काही अनियमितता दुरुस्त करण्यात येईल, असे म्हात्रे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. ते अतिक्रमण अद्याप काढून न टाकल्याने पालिकेने त्यांना नोटीस दिली आहे.

बेलापूरच्या आमदार म्हात्रे यांचा आग्रोली तलावाजवळ गौरव नावाचा बंगला आहे. या बंगल्याचे बांधकाम मंजूर आराखडय़ानुसार झालेले नसल्याने गतवर्षी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित सुनावणीच्या वेळी बंगल्याच्या प्रवेशद्वारात झालेला बदल,  छत, संरक्षण भिंत बांधताना वाढीव केलेले बांधकाम यांसारख्या नऊ अतिक्रमणावर आक्षेप घेण्यात आले होते. ते आश्वासन म्हात्रे यांनी न पाळल्याने पालिकेने नोटीस बजावली आहे. पालिकेची नोटीस मिळाली असून करण्यात आलेले अतिक्रमण निष्काषित करण्यात येईल असे नीलेश म्हात्रे यांनी सांगितले.

हे प्रकरण गेली वर्षेभर न्यायालयात प्रलंबित होते. ते आमच्या विरोधकांनी लावून धरले होते. अशा नोटीसमुळे मी विचलित होणारी नाही. न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे हे अतिक्रमण ५ ऑगस्टपर्यंत काढले जाणार आहे.

मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर