पनवेल : तळोजा उपनगरामध्ये इमारतीखाली उभ्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यात पोळी बनविण्यासाठी लागणारा मार्बलचा पोळपाट पडल्याने मुलगा जखमी झाला. सध्या या मुलाची प्रकृती बरी असून त्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

रविवारी दुपारी ही घटना तळोजा उपनगरातील सेक्टर १० येथील कैलास टॉवर इमारतीखाली घडली. दहावीत असणारा हा मुलगा कैलास टॉवरमधील तळमजल्यावर दुचाकी दुरुस्तीच्या दुकानासमोर उभा होता. दुपारी १२ वाजता या मुलाच्या डोक्यावर मार्बलचे पोळीपाट पडल्याने डोक्यात खोलवर जखम झाली. डॉक्टरांनी या मुलावर उपचार केले. डोक्यात तीन ते चार टाके पडले. या मुलाचे वडील वाहन चालविण्याचे काम करतात. या घटनेनंतर तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार ११८ (१) या कलमाव्दारे अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय अहिरे अधिक तपास करीत आहेत.