नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईश्वरनगर, आनंदनगर येथील प्रभाग क्रमांक १ व २मध्ये आणि ठाण्याच्या वेशीवरील आनंदनगर येथे मोकळ्या जागेवर आणि रस्त्यांलगत दर रविवारी विनापरवाना आठवडा बाजार भरतो. व्यापाऱ्यांकडून पैसे घेणारे दलाल आणि राजकीय नेत्यांच्या अशीर्वादाने विक्री करणारे फुकटे व्यापारी यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिकांना येण्याजाण्यासाठी रस्ता नसताना या आठवडा बाजारावर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
आनंदनगर, ईश्वरनगर, बालीनगर ते मुंकद हा दिघा विभाग कार्यालयाच्या अंतर्गत येणारा प्रभाग आहे. या प्रभागालाच लागून ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक २४ आहे. वेशीवर असणाऱ्या या प्रभागात नवी मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या आनंदनगर येथील मैदानात आणि ईश्वरनगरच्या रोडवर रस्त्यांच्या दुतर्फा दर रविवारी आठवडा बाजार भरतो. सुमारे १००० हून अधिक कपडे, भांडी, भाजीपाला व इतर साहित्यांचे विक्रेते या बाजारात व्यवसाय करतात. अधीच अनेक अनधिकृत दुकानांनी रस्ता गिळंकृत केलेला असताना महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसलेल्या या आठवडा बाजाराने नागरिकांना चालणे कठीण करून ठेवले आहे. तर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील पदपथ दलालांच्या भीतीने आठवडा बाजारातील व्यापांऱ्याना वापरण्यासाठी दिले आहेत. आठवडी बाजार ही संकल्पना जुनी असली तरी इथे मात्र दलाल या व्यापाऱ्यांकडून ४० ते १०० रुपये घेऊन, विक्रेत्यांना रस्त्यावर व्यापार करण्यास परवानगी देतात. विनापरवाना भरणारा हा बाजार फुकटय़ा व्यापाऱ्यांसाठी लाभदायक ठरला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या व्यापाऱ्यांकडून आपले हात ओले करून घेतले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास या परिसरात अग्निशमन दलाची गाडी किं वा रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. दिघा विभाग कार्यालयाचे एवढय़ा मोठय़ा बाजाराकडे दुर्लक्ष कसे होते, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
