रिक्षा चालकाने एनएमएमटीच्या बस चालकाला बेदम मारहाण करत वाहतूक रोखून धरल्याची घटना शनिवारी घणसोलीत घडली. घणसोली येथील डीमार्टजवळून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बस धावतात. दुपारी चारच्या सुमारास सेक्टर पाच येथे बससमोर रिक्षा उभी असताना बसचालकाने हॉर्न वाजवून रिक्षावाल्याला पुढे जाऊ देण्याची सूचना केली. मात्र, हॉर्न वाजविल्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने शिवीगाळ करीत बसचालक फैयाज पठाण याला बेदम मारहाण केली. तसेच पठाण यांना रस्त्यावर ढकलून देत तेथील सायकल पठाण याच्या डोक्यात घातली. या रिक्षाचालकाच्या मदतीला टॅक्सीचालकदेखील आल्याने मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या वाहकालादेखील मारहाण करण्यात आली. या वेळी रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती.  अखेर काही स्थानिक तरुणांनी पुढे येऊन मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही हा रिक्षाचालक  बसचालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. या वेळी अन्य बसचालकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. सायंकाळी बसचालकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. भाजपचे पदाधिकारी कृष्णा पाटील आणि स्थानिक नगरसेविका उषा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रिक्षाचालकांच्या टोळक्याने अशाच पद्धतीने बसचालकांना मारहाण केल्याची घटना घडल्यावर या परिसरात वाहतूक पोलीस तनात करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याबाबत तक्रार केल्यास हे रिक्षाचालक मारहाण करतात. बसमुळे रिक्षाव्यवसायावर परिणाम झाल्याने हे प्रकार घडत असल्याचे मानले जाते.