श्री श्री शंकर सेवा समिती आणि स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात सामाजिक संस्थांची परिषद सी ट्वेंटी आयोजित करण्यात आली होती. G-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषविण्याचा मान यावर्षी भारताला लाभला आहे. वसुधैव कुटुंबकम संकल्पनेवर आर्थिक, सामाजिक, उद्योग विषयक अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नवी मुंबईत जी २० शिखर परिषदेच्या अंतर्गत सामाजिक संस्थानांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये नवी मुंबई, ठाणे पालघर जिल्हा आणि राज्यातील अन्य भागातून आलेल्या सामाजिक संस्थांनी त्यांचं कार्य उपस्थितांसमोर ठेवलं त्याचबरोबर येणाऱ्या अडचणी विशद केल्या. खासकरून उद्योग जगतातून सहकार्याची अपेक्षा या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. हेही वाचा >>> नवी मुंबई: एमआयडीसीतील अनावश्यक वृक्ष तोडीला बसणार चाप;वनविभागाच्या नाहरकतीनंतरच मिळणार मंजुरी या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक व विद्युत-अभियंता विवेकानंद वडके, आमदार गणेश नाईक , स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे विवेक सुपण्णवार, स्वामी विवेकानंद केंद्राचे अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दमदार वाटचाल सुरू असून भारत देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. देशातील अनेकता हीच आपली ताकद आहे. समाजासाठी काम करणाऱ्या संस्था या परिषदेमध्ये सहभागी झाल्या असून या संस्थांसाठी अशा प्रकारच्या परिषदा पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात, असे मत विवेकानंद वडके यांनी मांडले.