नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असणाऱ्या शौचालय कंत्राट हे दादागिरी करून वाटण्यात आली यात अनियमितता असून त्यामुळे ७ कोटी ६ १लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह अन्य सात असे एकूण आठ जणांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रविंद्र आनंदराव पाटील (सेवानिवृत्त तत्कालिन उपसचिव), सिताराम कावरखे (सेवानिवृत तत्कालिन उपसचिव), जी. एम. वाकडे (सेवानिवृत्त तत्कालिन उपसचिव), विजय पद्माकर शिंगाडे (उपसचिव एपीएमसी), सुदर्शन पांडुरंग भोजनकर ( उपअभियंता, एपीएमसी), राजेंद्र झुंजारराव ( कनिष्ठ अभियंता एपीएमसी), विलास पाडुरंग पवार( कार्यालयीन अधिक्षक) बाजार समिती सदस्य शशिकांत शिंदे असे आरोपींची नावे आहेत. या सर्वांनी मिळून वेळोवेळी कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया डावलुन गैरलाभ पोहोचवणारे निर्णय घेतले. कायदेशीर कर्तव्ये पार न पाडता समितीच्या हिताचे आवश्यक असे कायदेशीर करार न करता त्यांचे अधिपत्याखालील व नियंत्रणात असलेली कृषी उत्पन्न बाजार येथील प्रसाधनगृहे अप्रामाणिकपणे व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून २०१७ पुर्वी निवीदा प्रक्रिया न राबविता व सन २०१७ ते २०१८ मध्ये सदोष निवीदा प्रक्रिया राबवून सुरेश मारु यांचेशी हितसंबंधाने सुरेश मारु यांचेशी संबधित संस्थाना गैरलाभ मिळून फायदा होणेकरीता नियमबाह्य पध्दतीने प्रसाधनगृहे भाडेतत्त्वावर दिले. यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करुन मदत केलेली आहे.
आणखी वाचा-दिवाळी फराळासह आता रसदार आंबे, मलावी देशातून आंबे दाखल
त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये देखील सदोष पध्दतीने बेकायदेशीर निर्णय घेवून वाटप केल्या गेलेल्या प्रसाधनगृहांचे माध्यमातुन बाजारसमितीची पर्यायाने शासनाची २००५ ते २०२२ या कालावधीमध्ये एकूण ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे आर्थिक नुकसान केले. मुंबई कृषी उत्तन्न बाजारसमितीची व पर्यायाने शासनाची संगणमताने फसवणुक करुन अन्यायाने विश्वासघात केला असा ठपका ठेवण्यात आला आहे. सदर तक्रार विशेष लेखा परीक्षक भगवान तुकाराम बोत्रे यांनी दाखल केली आहे. याबाबत शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही