नवी मुंबई: १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात वावरत असतानाचे गुपचूप फोटो काढून समाज माध्यमात टाकणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. 

संजय खाडे असे यातील आरोपीचे नाव आहे. आरोपी खाडे आणि यातील फिर्यादी हे एकमेकांना ओळखतात. रबाळे एमआयडीसी  पोलीस ठाणे क्षेत्रात राहात असलेल्या एका १२ वर्षीय मुलीचे घरात वावरत असताना आणि खाजगी काम करताना खाडे याने गुपचूप फोटो काढले. एवढ्यावर तो न थांबता हे फोटो त्याने मोबाईल वर स्टेटस  म्हणून ठेवले.

आणखी वाचा-पनवेल : कामोठ्यात सहा लाखांची घरफोडी

ही बाब मुलीच्या कुटुंबियांना कळली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी थेट रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व खाडे यांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा त्वरित केली असता खाडे यांच्या स्टेटसवर पीडित मुलीचे फोटो असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी खाडे यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे.