स्त्रीशक्तीचा जागर म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जात असले, तरी काळाच्या ओघात या उत्सवाच्या पद्धतीत बराच बदल घडला आहे. गावोगावीच्या देवींचे देव्हाऱ्यात मांडले जाणारे घट म्हणजे घटस्थापना या परंपरेसह आता उरणसारख्या ठिकाणीही मोठे मंडप टाकून दुर्गा महोत्सवाचा इव्हेंट होताना दिसत आहे. याशिवाय टिपऱ्या व गरबा या पारंपरिक नृत्याची जागा सध्या डॉल्बी, डीजेवर थिरकणाऱ्या दांडिया रासने घेतली आहे.

अनेक उत्सव मंडळे सामाजिक भान ठेवून अनेक वर्षे हा उत्सव साजरा करीत आहेत, तर कित्येक मंडळे परंपरेनुसार उत्सव साजरा करतात. ही झाली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे. तर दुसरीकडे शेकडो वर्षांपासून गावाच्या वेशीवर असलेल्या माता, देवी यांच्या मंदिरातही या नऊ दिवसांत उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे कुटुंबातील कुलदैवत व देवी यांचा जागर करण्यासाठी देव्हाऱ्यात तांब्यात नारळ ठेवून त्याला खायची पाने लावून एक घट निर्माण केला जातो, त्याची विधिवत पूजा केली जाते. या घटच्या पूजनाला तांदळाच्या पिठात गुळ घालून छोटय़ा पुऱ्या बनविल्या जातात. त्याला उरण परिसरात पानगुळ्या म्हणतात. हाच नैवद्य नऊ दिवस देवीला दिला जातो अशी परंपरा आहे. ज्या गावांमध्ये देवीची मंदिरे आहेत, तेथे नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. यामध्ये आता बदल घडू लागला आहे. प्रत्येक गावात किमान एक तरी नवरात्रोत्सव मंडळ स्थापन झाले आहे. ही मंडळे नऊ दिवस विविध कार्यक्रम आखतात. यानिमित्त विविध स्पर्धाही सध्या भरविल्या जात असल्याची माहिती उरणमधील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष नंदन पानसरे यांनी दिली आहे. यामधून अनेक जणांना व्यासपीठ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या मंडळाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरीकडे नवरात्रोत्सवात गरबा खेळून देवीचा जागर करण्याची अनेक वर्षांची परंपरा वाणी आळी येथे आजही सुरू आहे.