नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाची उभारणी करत असताना उलवे नदीचा मार्गबदल, ४५० हेक्टरपेक्षा अधिक सीआरझेड क्षेत्रावर झालेली प्रकल्पांची आखणी, भुईसपाट करण्यात आलेली उलवे टेकडी आणि पुरापासून नियोजित विमानतळाचे संरक्षण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला भराव यामुळे या प्रकल्पस्थळाचा चेहरामोहरा एव्हाना बदलला आहे. या विमानतळाची क्षमता नऊ कोटी प्रवाशांपर्यत नेता यावी यासाठी सिडको आणि अदानी विमानतळ कंपनीने लवकरच विस्तारीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना खारफुटीचे पुनर्रोपण तसेच वनीकरणाची कामेही युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आखणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिला टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. येत्या २५ डिसेंबरपासून या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. नवी मुंबई विमानतळाचे एकूण चार टप्प्यांत विस्तारीकरण होणार असून आवश्यकता भासल्यास ११६० हेक्टर क्षेत्रात पाचवा टप्पाही उभारणे शक्य असल्याचा दावा यापूर्वीच नवी मुंबई विमानतळ कंपनीने केला आहे. मध्यंतरी नवी मुंबई विमानतळ कंपनीने सिडकोच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील विमानसेवा आणि नियोजित प्रवाशांच्या अभ्यासाकरिता आंतरराष्ट्रीय सल्लागार मेसर्स आयसीएफ कन्सल्टिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि नवी मुंबई विमानतळासंबंधी नवा वाहतूक अंदाज अभ्यास तयार केला.

नवी मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता एकूण सहा कोटी प्रवाशांपर्यत आखण्यात आली आहे. ही क्षमता वाढवली नाही तर मुंबई शहर आणि महानगर प्रदेशाला पुढील १५ वर्षांत (२०२५-२०४०) किमान ३ ते ६ कोटी इतक्या विमान प्रवासी क्षमतेची तूट सहन करावी लागेल, जी पुढील २५ वर्षांच्या कालावधीत (२०२५-२०५०) सात ते १४ कोटी पर्यत वाढेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. हे लक्षात घेता नवी मुंबई विमानतळाची क्षमता सहा वरून नऊ कोटी प्रवासी क्षमतेपर्यत वाढविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. तसेच या विमानतळाची मालवाहतूक क्षमताही वाढविण्यात आली आहे.

नवी मुंबई विमानतळाची उभारणी करताना या संपूर्ण पट्ट्यात पर्यावरणाची मोठी उलथापालथ पहायला मिळाली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रकल्पाच्या ठिकाणी असलेली उलवे टेकडी काढणे, नवीन बांधलेल्या उलवे रिसोर्स चॅनेल (यूआरसी) द्वारे उलवे नदीचे पात्र वळविणे, मोठा भराव करून खारफुटीची कत्तल या प्रकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे संरचनात्मक टेकड्या, चिखलाचे फ्लॅट, भरती-ओहोटीचे फ्लॅट आणि नदीकाठांचे रूपांतर, जमिनीचे मोठ्या प्रमाणावर सपाटीकरणाची कामे यापूर्वीच येथे करण्यात आली आहेत. दरम्यान विमानतळाचे विस्तारीकरण करत असताना सिडकोने पर्यावरण संवर्धनाची इतर कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत, अशी माहिती सिडकोतील वरिष्ठ सूत्रांनी लोकसत्ताला दिली.

सिडको आणि कांदळवन कक्षाने आतापर्यत ३७० हेक्टरवर खारफुटीचे रोपण पूर्ण केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापैकी खारफुटी संवर्धन विभागाने ३१० हेक्टरवर तर सिडकोने ६० हेक्टरवर खारफुटीचे रोपण केले आहे. जुई आणि तळोजा खाडींमधील कोल्हेखर गावात अतिरिक्त १०८ हेक्टरवर खारफुटींचे रोपण करण्यात आले असून या संपूर्ण पट्टयाला ना विकास क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून अलिबाग येथे ३५ हेक्टर निकृष्ट वनजमिनीवर वनीकरण कार्यक्रम सुरू आहे. खडकाळ आणि लहरी भूभागात आतापर्यत ३८,८९६ रोपे लावण्यात आली आहेत. येत्या सात वर्षात हा वनीकरणाचा कार्यक्रम पूर्ण होईल, असा दावा सिडकोने केला.

‘एमसीझेडएमए’ची मंजुरी

अदानी समूहाच्या विमानतळ कंपनीने विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे नुकताच एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात कंपनीने विमानतळाच्या विस्तारीकरणाची योजना सादर केली होती. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आखण्यात आलेल्या उपायांचा आराखडाही प्राधिकरणाला सादर केला होता. विमानतळ विस्तारीकरणाच्या या आराखड्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.