नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील पामबीच मार्गालगत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापासून काही अंतरावर उभारण्यात येणाऱ्या महाआवास डीआरएस गृहनिर्माण योजनेअंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) बहुप्रतीक्षित गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी सिडको महामंडळाने सोमवारी पात्र कंत्राटदारांकडून ई – निविदा प्रक्रियेद्वारे बोली मागवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सिडकोने या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नेमण्याचा निर्णय घेतला होता. ४२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी ६१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आयएएस आणि आयपीएस अधिकारी यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) बेलापूर (सीबीडी) येथील सेक्टर-१५ अ, भूखंड क्रमांक २० येथे उभारला जाणार आहे. गेल्या वर्षी २ सप्टेंबरच्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती मंजूर करण्यात आली होती.
या योजनेत तीन आणि साडेतीन ते चार शयनकक्ष असलेल्या सदनिका राज्यातील व्हीआयपींसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. या सदनिकांचे क्षेत्रफळ १,२०० ते १८०० चौरस फुट असणारे आहे. सिडकोने अद्याप या सदनिकांची विक्री किंमत जाहीर केली नसली तरी नुकत्याच काढलेल्या सोडतीमध्ये खारघर येथील रेल्वेस्थानकाशेजारील ५४० चौरस फुटांचे घर ९७ लाखांना विक्रीस उपलब्ध केले होते. तसेच सध्या नेरूळ येथील पामबीच लगतचा भूखंड सिडकोने ७ लाख ६५ हजार प्रति चौरस मीटरने विक्री केला आहे. त्यामुळे व्हीआयपींसाठीच्या सव्वा दोन ते सव्वा तीन कोटींच्या पुढे किंमत आकारली जाण्याची शक्यता आहे. सध्या या परिसरातील खासगी विकासकांकडील दरांच्या तुलनेत ही किंमत कमी असल्याचे बोलले जात आहे. सिडकोने बांधलेली घरे प्रशस्त असतात आणि खासगी विकासकांप्रमाणे अधिभार आकारला जात नसल्याने ही घरे व्हीआयपींना परवडणारी असण्याची शक्यता आहे. या गृह प्रकल्पासाठी १ जानेवारी २०२० नंतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच न्यायमूर्ती, आयएएस आणि आयपीएस अधिकारी पात्र ठरतील असे धोरण सिडकोने स्विकारले आहे.
या संबंधित निविदा प्रक्रियेत पात्र कंत्राटदाराला तांत्रिक व व्यावसायिक या पद्धतीने दोन टप्प्यांत बोली लावावी लागणार आहे. संबंधित कंत्राटदारांनी केंद्र किंवा राज्य शासनाकडे नोंदणीकृत तसेच समान प्रकारचे काम पूर्ण करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
पामबीच मार्गाचे महत्त्व
पामबीच रोडवरील उंच इमारतींमधून थेट मुंबईचे दर्शन आणि खाडीकिनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येते. या परिसरात अनिवासी भारतीयांसाठी गृहप्रकल्प आहे. याच परिसरात पाणथळी असल्याने दुर्मीळ पक्षी पाहण्यासाठी येथे पक्षी निरीक्षक येतात. आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त येथून पाच किलोमीटरवर आहे. बेलापूर, नेरुळ, सीवूड आणि वाशी या चारही उपनगरांशी सुलभ दळणवळणाची सुविधा आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या समूह निवासामुळे या परिसराची भविष्यातील ओळख व्हीआयपी नगर अशी होईल.