इमारतीत केवळ विवाहसोहळे; सहा वर्षांनंतरही वस्तुसंग्रहालय, वाचनालय रिकामेच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोने आगरी कोळ्यांच्या जमिनीवर नवी मुंबई वसवली; मात्र आता या समाजाची संस्कृती दर्शवणाऱ्या ‘आगरी कोळी संस्कृती भवना’चे काम पूर्ण करण्याचा सिडकोला विसर पडला आहे. नेरुळ येथील हे भवन सहा वर्षांनंतरही सुरू झालेले नाही. सहा वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावरच या वास्तूचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

नवी मुंबईत बेलापूर ते दिघा,  बेलापूर ते पनवेल आणि उरणपट्टय़ात मोठय़ा प्रमाणात आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. नवी मुंबई शहर वसविण्यासाठी सिडकोने या गावकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित केल्या. या समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी नेरुळ सेक्टर २४येथे भूखंड क्रमांक ९वर आगरी कोळी संस्कृती भवन साकारण्यात आले. १३ ऑगस्ट २०११ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या भवनाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु   सहा वर्षे उलटली तरीही वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय रिकामेच आहे. भवनातील सभागृह आगरी कोळी समाजातील व्यक्तींना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते. परंतु ज्या उद्देशाने आगरी कोळी संस्कृती भवन सिडकोने उभारले तो उद्देश मात्र अद्याप साध्य झालेला नाही. सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक नामदेव भगत यांनीही सिडकोने वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय सुरू करावे, यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु सिडको मात्र वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय निर्मितीकडे दुर्लक्ष करत आहे.

आगरी कोळी संस्कृती भवनाच्या निर्मितीला व उद्घाटनाला नारळी पौर्णिमेला ६ वर्षे झाली आहेत. येथे वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय साकारण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सद्य:स्थितीला येथे चंद्रकला कदम यांनी साकारलेली तीन चित्रे लावण्यात आली आहेत.

– मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको


भवनाचे स्वरूप

* भवनाची इमारत होडीच्या आकाराची आहे.

* भवनाच्या पहिल्या मजल्यावर वस्तुसंग्रहालय बांधण्यात आले. आगरी कोळी भाषेत लिहलेली पुस्तके, नाटके नवी मुंबईकरांना वाचता यावीत म्हणून ग्रंथालयाचीही सोय करण्यात आली.

* सहा वर्षांनंतरही वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय रिकामेच आहे.

* दुसऱ्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह व तिसऱ्या मजल्यावर ५०० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह बांधण्यात आले आहे.

आम्ही आगरी कोळी बांधव या शहराचे मूळ रहिवासी. आमच्या समाजाची संस्कृती जपण्यासाठी सिडकोने आगरी कोळी भवनात एक मजला संस्कृती दर्शनासाठी रिकामा ठेवला आहे. आगरी कोळी समाजात वापरल्या जाणाऱ्या वडिलोपार्जित वस्तूंचा संग्रह मी केला आहे. या वस्तू येथे मांडून आपल्या समाजाचे व संस्कृतीचे दर्शन व्हावे, असे वाटत होते. परंतु सिडकोने याकडे दुर्लक्ष केले आहे.

– पुंडलिक पाटील, संग्राहक, आगरी कोळी समाज

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco forgot to complete the work of agri koli sanskriti bhavan
First published on: 08-08-2017 at 03:52 IST