प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीसाठी लागणाऱ्या पावणे सात कोटी क्युबिक मीटर मातीच्या भरावासाठी जवळचे डोंगर सांभाळून ठेवण्याची चिंता सिडकोला लागून राहिली आहे. रात्रीच्या वेळी होणारे मातीचे उत्खनन रोखण्यासाठी डोळ्यात तेल टाकून पहारा देण्याची मोठी जबाबदारी सशस्त्र पथकावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या एकूण जमिनीच्या संरक्षणासाठी नेमलेल्या विशेष पथकाला होणाऱ्या मातीची चोरी रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकाने अवैध मातीचे उत्खनन करणाऱ्या तीन मातीमाफियांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत.
विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने सिडको विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांची घोषणाही केली जात नाही. विमानतळासाठी सिडको अखात्यारीतील सपाटीकरण, उलवा टेकडी कपात, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, यासारख्या साडेतीन हजार कोटीच्या कामांची निविदांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होणार आहे. दुसरीकडे प्रत्यक्ष विमानतळाचे काम करणाऱ्या विकासकांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये या निविदा खुल्या होण्याची शक्यता आहे. गोवा विमानतळाचे काम मिळाल्यामुळे हिरानंदानी-झुरीच या बांधकाम कंपनीलाही पात्र (यापूर्वी सुकाणू समितीने या कंपनीला आर्थिक सुरक्षितता या कारणास्तव बाद केले होते.) ठरविले असून ती चौथी कंपनी आता या स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया थोडीफार लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे दोन पातळीवर समांतर काम सुरू असताना प्रकल्पग्रस्तांचा असहकार वगळता विमानतळाची उभारणी करण्याच्या दिशेने सिडकोच्या हालचाली सुरू आहेत.
नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमिन लागणार असून त्यातील दहा गावाची ६७१ हेक्टर जमिन संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र विमानतळ उभारणीसाठी लागणारी ११६० हेक्टर जमिन सिडकोच्या ताब्यात असून तिचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. याच परिसरात मोठय़ा प्रमाणात डोंगर रांगा असून रात्रीच्या वेळी या भागात फोकलेन लावून अवैध माती उत्खनन सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही माती माफिया भरावासाठी इतरत्र विकत आहेत. अशा प्रकारे माती गायब झाल्यास सिडकोला दोन रणवे साठी पाच मीटर पर्यंत करावयाच्या भरावासाठी माती कमी पडण्याची शक्यता असून अधिक लागणारी माती आणण्यासाठी या जागेपासून दूर जावे लागणार आहे. सिडकोला ह्य़ा पाच मीटर भरावासाठी पावणेसात करोड क्युबिक मीटर माती लागणार आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च वाढणार असून मातीचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी सिडको पाच मीटर मातीचा भराव करुन देणार असून शिल्लक तीन मीटर भराव ही विमानतळ उभारणारी कंपनी त्यांच्या आराखडय़ानुसार करणार आहे. त्यामुळे पाच मीटर भरावासाठी लागणारी माती आत्तापासून सांभाळून ठेवण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सिडकोने एकूणच विमानतळ जमिनीवर मोठय़ा प्रमाणात वाढणारे अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे यांना रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष सशस्त्र संरक्षण पथकावर मातीचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे या पथकाने रात्रीच्या वेळी माती चोरणाऱ्या तीन जणांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत.
विमानतळाच्या गाभा क्षेत्रात पहाटेच्या वेळी मोठय़ा प्रमाणात यंत्रणा लावून माती चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. विमानतळ सपाटीकरणासाठी लागणारी माती इतरत्र ठिकाणाहून आणावी लागल्यास सिडकोला २५ ते ३० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च पडणार आहे. त्यामुळे आयआयटीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपलब्ध माती जपण्याचा सिडको प्रयत्न करीत असून विशेष पथकाला माती चोरांवर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी तीन माती माफियांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत.
संजय चौधरी, मुख्य अभियंता, सिडको.