नवी मुंबई – जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या देशभरातून जड-अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. रस्ते चांगले असले तरी यार्ड हे अंतर्गत भागात असल्याने छोटय़ा गावातूनही ही वाहतूक वाढली आहे. त्यात वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना परिसरातील नागरिकांना वारंवार करावा लागतो.  शीव, पनवेल, ठाणे, बेलापूर, पामबीच या ठिकाणी  वाहतूक कोंडी झाली की जी सतर्कता वाहतूक पोलीस दाखवतात ती सतर्कता जेएनपीटीकडे छोटय़ा गावातून जाणाऱ्या मार्गावर दाखवली जात नाही. या मार्गावरील खास करून दिघोटे परिसरात कंटेनर यार्ड व नवी मुंबई, मुंबई-पनवेल परिसरातील अनेकांची शेतघरे असल्याने कंटेनर ते हलकी वाहने सर्वाचाच वावर मोठय़ा प्रमाणावर असतो. हाच अनुभव कमी-अधिक प्रमाणात  जेएनपीटीकडे जाणाऱ्या हमरस्त्याव्यतिरिक्त गावातून जाणाऱ्या रस्त्यांवर येतो. रात्रीच्या वेळेस जर वाहतूक कोंडीत अडकले तर एक-दीड किलोमीटरसाठी किमान दीड तासही  लागतो. अशा ठिकाणी औषधालाही वाहतूक पोलीस सापडत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा कंटेनर वा ट्रकमधील मदतनीस खाली उतरून वाहतूक कोंडी सोडवतो. वाहतूक कोंडीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हलकी वाहने अनेकदा मार्गिका सोडून गाडी हाकतात. परिणामी काही अंतरावर अडकून वाहतूक कोंडी होते. अशा वेळी वाहतूक पोलिसांची नितांत गरज असते, मात्र ते नसतात अशी माहिती स्थानिक रहिवासी अरिवद म्हात्रे यांनी दिली. आजारी व्यक्तीला रुग्णवाहिकेत न्यायचे झाले तर वाहतूक कोंडीची काळजी असते, अशी खंत दिघोडा परिसरात राहणारे किशन म्हात्रे यांनी व्यक्त केली, तर कंटेनर चालक रघुवीर गुप्तता याने सांगितले की, वाहन पार्क करण्यास जागा देणे आवश्यक आहे जी सोयीची असेल.  दिघोटा गावातून जाणारा मार्ग पुढे मुंबई-गोवा मार्गाला जोडला जातो.  त्यामुळे या रस्त्यावर हलक्या वाहनांचीही वावर मोठय़ा प्रमाणावर आहे. त्याचबरोबर दिघोडे परिसरात कंटेनर यार्ड आणि नवी मुंबई-पनवेल परिसरातील अनेक राजकीय नेते श्रीमंत लोकांचे शेतघरेही आहेत. त्यामुळे हलकी आणि जड-अवजड वाहनांचा वावर मोठय़ा प्रमाणात असतो. दुसरीकडे रस्ता अरुंद आणि बेशिस्त वाहतूक त्यात वाहतूक पोलिसांचा शून्य वावर अशा दुष्टचक्रात वाहतूक कोंडी प्रचंड होते.

वाहतूक कोंडी होणारी गावे

  • दिघोडा ते चिरनेर, दिघोडा ते जांभूळ फाटा ,खारपाडा, दास्तान फाटा, गव्हाण फाटा, खोपटा
  • पनवेल ते जेएनपीटी  मार्गावर धुतूम पाडेघर नवघर पागोटा.

या परिसरातील वाहतूक कोंडी समस्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत. दिघोडे, चिरनेर, गव्हाणफाटा परिसरांतील वाहतूक कोंडी समस्या आहे त्यानुसार वाहतूक पोलिसांनी बेकायदा कंटेनर थांबण्याची जागा, बेशिस्त गाडी चालवणारे वाहन यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

– पुरुषोत्तम कराड (पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा) : 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens suffer from traffic congestion jnpt ysh
First published on: 15-02-2022 at 00:34 IST