नवी मुंबई : शहरात करोना प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना करोना नियमांचा विसर पडलेला दिसत आहे. कारवाई पथकेही गायब  झाल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. मुखपट्टी हनुवटीवर आली असून सुरक्षा अंतरही पाळले जात नाही. परिणामी शहरात करोना रुग्णांत काहीशी वाढ दिसत आहे. आठवडाभरात शहरात करोनाचे ३१६ नवे रुग्ण सापडले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांपेक्षा नवी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या अधिक आहे.

नवी मुंबईत गणपती उत्सवाअगोदरपासून करोनाची दुसरी लाट ओसरली असून दैनंदिन करोना रुग्ण ५० पेक्षा कमी आहेत. गणपती उत्सवात झालेली गर्दी पाहता रुग्णवाढीचा धोका वर्तवला होता. मात्र तरीही शहरात दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत ती ३० ते ४० च्या घरात आली होती. दरम्यान शहरातील करोना परिस्थिती आटोक्यात असल्याने पालिका प्रशासनाची दक्षता पथकाकडून होणारी कारवाईही कमी झालेली आहे. कोणीही विचारत नसल्याने आता नागरिकांना करोना नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे. सध्या दिवाळीसाठी बाजारात गर्दी होत आहे, मात्र या गर्दीतही करोनाचे नियम पाळले जात नाहीत. काहींना मुखपट्टीचा विसर पडल्याचे दिसत आहे तर काही जण केवळ नावापुरती मुखपट्टी घालत आहेत. सुरक्षा अंतराचा नियम तर कोणीच पाळताना दिसत नाही.  यामुळे शहरात करोनाच्या रुग्णांत अल्प प्रमाणात का होईना वाढ दिसू लागली आहे. २६ ऑक्टोबरला शहरात फक्त २७ करोना रुग्ण होते. ते २७ ऑक्टोबरला ६२ पर्यंत गेले. तर २८ ऑक्टोबरला ४१ असलेली रुग्णसंख्या ७५ पर्यंत गेली होती. शनिवार व रविवारी रुग्णसंख्या अनुक्रमे ३४ व ३८ इतकी राहिली आहे. ही रुग्णसंख्या पाहता शहरात रुग्णवाढ दिसत आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरातील इतर महापालिकांची तुलना करता नवी मुंबईतील ही आकडेवारी अधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.   सध्या शहरात विभागवार १ याप्रमाणे ८ व पालिका पातळीवरील १ अशी ९ पथके असून त्यांची कारवाई एकदमच थंडावल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीनंतर अचानक करोनाचा विस्फोट होण्याची भीती असून कडक कारवाई करण्याची गरज आहे.

काही दिवसांतील करोना रुग्णसंख्या

* २६ ऑक्टोबर : २७

* २७ ऑक्टोबर  : ६२

* २८ ऑक्टोबर : ४१

* २९ ऑक्टोबर : ७५

* ३० ऑक्टोबर : ३४

* ३१ ऑक्टोबर : ३८

१०८५५८ करोना रुग्ण

१९५३ करांना मृत्यू

मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून मुखपट्टीविना फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागरिकांमध्ये बिनधास्तपणा आला आहे. परंतु हा शहरासाठी धोका असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. परिस्थिती पुन्हा बदलू शकते. दक्षता पथकांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका