झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे, दिवे, ग्रिलची चोरी

स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०१७ च्या ५०० स्वच्छ शहरांत प्रथम येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंबर कसली असताना आणि पालिकेचे कर्मचारी व अधिकारीही शहर स्वच्छतेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना झोपडपट्टीवासीय मात्र हे स्वप्न साकारण्यात अडथळा ठरत आहेत. पालिकेचे विभाग अधिकारी व कर्मचारी पहाटे ५ पासून येणाऱ्या स्वच्छताविषयक तक्रारी निकाली काढण्यासाठी झटत असताना, झोपडपट्टीवासीय मात्र स्वत:च्या सवयी न बदलण्यावर ठाम आहेत.

नागरिकांना आपापल्या परिसरातील स्वच्छतेच्या स्थितीविषयी मत मांडता यावे, म्हणून केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत २०१७’अंतर्गत १९६९ हा दूरध्वनी क्रमांक दिला आहे. यावर तक्रारी करण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या सेवेविषयी जनजागृतीही करण्यात आली आहे. स्वच्छ भारत २०१७ च्या अनुषंगाने केंद्राचे दर्जा तपासणी नवी मुंबईत येणार आहे. त्याअनुषंगाने पालिकेतील कर्मचारी व अधिकारी स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहेत. शहरात उघडय़ावर शौचास बसणाऱ्या झोपडपट्टीवासीयांकडून दंड वसूल केला जात आहे. उघडय़ावर शौचास बसण्याविरोधात जनजागृती केली जात आहे. पालिकेने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती केली आहे. पण काही समाजकंटक सार्वजनिक शौचालयांमधील नळ, ग्रिल, दरवाजे, दिवे चोरून नेत असल्याचे आणि त्यांची नासधूस करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेचे कर्मचारीदेखील हतबल झाले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वच्छ भारत योजनेअंतर्गत महापालिका कक्षात ऑगस्ट २०१५ मध्ये सेल स्थापन केला. नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३,३९८ रहिवाशंच्या घरी शौचालय नसल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी सुमारे २००० जणांना अनुदान देण्यात आले, तर काही ठिकाणी सामुदायिक शौचालये बांधण्यात आली. ७०० शौचालये पालिकेने बांधली आहेत, तरीही अस्वच्छता कायम आहे.

सकाळी लावलेल्या ४० नळांची दुपारी चोरी

दोन आठवडय़ांपूर्वी केंद्र शासनाचे पथक पाहणीसाठी आले असता, यादव नगर झोपडपट्टीतील शौचालयामध्ये सकाळी बसवलेल्या नळांपैकी ४० नळ चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवांशावर कसा अंकुश ठेवावा, असा प्रश्न पालिका अधिकांऱ्याना पडला आहे.