Navi Mumbai Semiconductor project: भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचे देव म्हटले जाते. शोएब अख्तर असू दे नाहीतर कोणताही वेगवान गोलंदाज असू द्या, त्यांनी प्रत्येक गोलंदाजाला चौकार, षटकार मारलेले आहेत. पण ते पिचवरून ‘चीप’वर कधी आले कळलेच नाही, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे सेमीकंडक्टर चीप प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी केली. मराठी माणूस युनिक, अद्ययावत आणि वेगळ्या क्षेत्रात क्रांती घडविण्याचे काम करत आहे. यामुळेच राज्य सरकार आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पाठीशी आहे. बांधकाम प्रकल्प राज्यासाठी गेमचेंजर ठरत आहेत. त्याचप्रमाणे सेमीकंडक्टर प्रकल्प देशासाठी महत्वाचा ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मविआ सरकारमुळे उद्योग राज्याबाहेर गेले

“विरोधकांकडून सातत्याने उद्योग पळाले, अशी टीका केली जाते. पण एका महिन्यात किंवा वर्षात उद्योग येत नाही. कोणत्याही उद्योगाला आणण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जे उद्योग गेले, त्यांना महाराष्ट्रात कामच करायचे नव्हते. कारण राज्य सरकारकडून त्यांना जे सहकार्य मिळायला हवे होते, ते मिळाले नाही”, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमचे सरकार आल्यानंतर आता अनेक उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्र आता उद्योग मित्र राज्य झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हे वाचा >> ‘एक देश एक निवडणुकी’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकांचं महत्व एवढंच वाटतंय तर…”

नवी मुबंई येथे आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आमच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चीपचे अनावरण होईल – फडणवीस

सेमीकंडक्टर प्रकल्पातील चीप समर्पितचा कार्यक्रम २०२६ मध्ये होणार आहे. तेव्हा आमच्याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेत असणार आहोत, यात आमच्या मनात शंका नाही. परंतु तुमच्या मनात शंका असो किंवा नसो. तेव्हाच्या कार्यक्रमाची आगाऊ नोंदणी आताच करून ठेवा, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तरा दाखल होती. रोहित पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हटले, “हा प्रकल्प महायुती सुरू करत असली तरी निश्चितपणे राज्यातील महाविकास आघाडीचे पुढील सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल.”