स्थायी समिती सदस्या मीरा पाटील यांची निवडणुकीच्या आधी पळवापळवी
नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या हातात सुपूर्द करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्या मीरा पाटील यांची निवडणूकपूर्व कशी पळवापळवी झाली याच्या सुरस कथा ऐकवल्या जात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी व पीठासीन अधिकारी शीतल उगले यांना खासदार राजन विचारे यांनी वस्तुस्थिती सांगितल्यानंतर काँग्रेसच्या पाटील यांना सोमवारी पहाटे दोन वाजता गोठवलीतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने शिवसेनेचे नेते घेऊन गेले. त्यानंतर पाटील सकाळी या नेत्यांच्या तावडीतून सटकल्या आणि राष्ट्रवादीच्या तंबूत गेल्या पण ऐन निवडणुकीत त्यांनी नगरसेवकपदावर तुळशीपत्र ठेवून पक्षादेशाच्या विरोधात शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे पालिकेतील महत्त्वाचे स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेचा ताब्यात आले आहे. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे.
नेरुळ येथील काँग्रेसचे माजी नगरससेवक व पक्षाचे सरचिटणीस संतोष शेट्टी यांच्या कट्टर समर्थक असलेल्या मीरा पाटील या नेरुळमधून गतवर्षी नगरसेविका झाल्या. त्यांच्या विजयात शेट्टी यांचा सिंहाचा वाटा मानला जात आहे. त्यामुळे शेट्टींचे आदेश त्यांच्यासाठी शिरसावंद्य असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. शेट्टी यांचा शाळांना विद्यार्थी बस पुरविण्याचा मोठा व्यवसाय आहे. ह्य़ा बसगाडय़ा विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर नेरुळ येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयासमोर उभ्या राहतात. त्याला राष्ट्रवादीचे उमेदवार जयवंत सुतार यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने सुतार यांचा वचपा काढण्याची संधी शेट्टी यांनी सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरविकास विभागाचा आक्षेप असताना विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश मोरे हे स्थायी समिती सदस्य होणार हे निश्चित झाले होते. महापौर हे सभागृहाचे सर्वोच्च पीठासीन अधिकारी असल्याने त्यांचा निर्णय सभागृहात प्रमाण मानला गेल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांच्या आदेशाने मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. हे होणार असल्याचे गृहीत धरून स्थायी समितीच्या पीठासीन अधिकारी उगले यांना शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्या वेळी स्यायी समितीच्या कोणत्याही सदस्याला सभापती निवडणुकीची विषयपात्रिका तीन दिवस अगोदर पोहोचणे आवश्यक असल्याच्या नियमाचा आधार घेतला गेला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना या निवडणुकीत काटेकोर लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने एकसदस्य निवडीद्वारे सभागृहात पाठविला तरी त्याला मतदानाचा अधिकार राहणार नसल्याने सभापती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांचे संख्याबळ समसमान होणार होते. त्यामुळे काँग्रेसच्या एका सदस्या मीरा पाटील यांना महत्त्व आले. त्यांना गोठवली गावातील माजी उपमहापौर व नवनियुक्त सरचिटणीस रमाकांत म्हात्रे यांच्या आश्रयाला ठेवण्यात आले होते. पाटील म्हात्रे यांच्या संरक्षण कवचात असल्याचे कळताच खासदार राजन विचारे यांनी म्हात्रे यांचे घर रात्री दोनच्या सुमारास गाठले. सोमवारच्या स्यायी समिती सभापती निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या मीरा पाटील यांचा ताबा पहाटे शिवसैनिकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांची रवानगी सीबीडीतील एका बडय़ा पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. त्याच ठिकाणी सर्व सदस्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेचे नेते निर्धास्त असताना पहाटे सातच्या सुमारास पाटील शिवसेनेच्या वेढय़ातून निसटल्या. त्या थेट राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेल्याने राष्ट्रवादीने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे पाटील यांना सोमवारी राष्ट्रवादीच्या महिला ब्रिगेडच्या गराडय़ात सभागृहात नेण्यात आले. पालिकेपर्यंत पाटील यांना सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी पार पाडली. १२ वाजता स्थायी समिती सभापती निवडणूक सुरू झाल्यानंतर पाटील यांनी मारलेल्या कोलांटउडीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली २० वर्षांच्या तिजोरी शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे स्पष्ट झाले. यासाठी दुसरी एक व्यूहरचना आखण्यात आली होती. मोरे यांना पीठासीन अधिकारी उगले यांनी मतदान करू दिले, तर पाटील यांनी राष्ट्रवादीला मतदान करण्याचे ठरले होते. तसे झाले नाही तर पाटील यांनी आपले निर्णायक मत शिवसेनेच्या पारडय़ात टाकण्याचे ठरविण्यात आले होते. यात पाटील यांनी पहाटे राष्ट्रवादीचा घेतलेला आधार हा शिवसेनेची राजकीय खेळी मानली जात आहे. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा असून पाटील यांना चांगलेच लक्ष्मीदर्शन घडविण्यात आले आहे. याशिवाय या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नेत्यांना खूश करण्याचे आश्वासन नवीन सभापती शिवराम पाटील यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल
स्यायी समितीत एक सदस्य असलेल्या भाजपला शिवसेनेच्या पािठब्यावर सभापतीपदाची संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्यात आले होत,े त्यामुळे पक्षवाढीस नेहमीच प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची विशेष सभा बेकायदेशीर ठरवली आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले, मात्र काँग्रेसने भाजपला मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले. काँग्रेसच्या सदस्या पाटील यांनी नगरसेवकपदावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेला केलेले मतदान हे व्यक्तिश: रागातून केलेले मतदान आहे. यात त्यांचे नगरसेवकपद बाद होण्याची शक्यता आहे.

पाटील यांची इच्छा पूर्ण झाली
पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या एकदा तरी हातात मिळाव्यात यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या शिवराम पाटील यांची सभापती होण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. पाटील एक अभ्यासू व चाणाक्ष नगरसेवक म्हणून ओळखले जातात. कोपरखैरणे येथील शहरी व ग्रामीण भागावर त्यांचे वर्चस्व असून ते स्वत: पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेले पाटील स्यायी समिती सभापती पद मिळावे यासाठी शिवसेनेते गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वारी केली. राष्ट्रवादीमध्येही त्यांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले आणि सभापती झाले. यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यांनी सोमवारी नागरी सत्कार मेळाव्यात माझा मुलगा सभापती झाल्याचा उल्लेख केला. दहा वर्षांपूर्वी म्हात्रे यांचा मुलगा नीलेश याला सभापती करण्यास नाईक गटाने तीव्र विरोध केला होता. त्याचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी जाहीरपणे व्यक्त केली.