वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ ई लाभार्थीना घरांचा ताबा

नवी मुंबई : घरांचा ताबा कधी मिळेल, या विवंचनेत असलेल्या सिडको महागृहनिर्मितीतील ग्राहकांना गुरुवारी प्रत्यक्षात ताबा मिळाल्याने त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले. आयुष्यातील पहिल्या घरांच्या चाव्या हातात पडल्यानंतर अनेकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सिडकोने गुरुवारी कळंबोली येथील गृहसंकुलातील घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली असून दिवसाला १०० घरांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यातील ११ लाभार्थीना करोनाचे सर्व नियम पाळून ताबा देण्यात आला. त्याचवेळी सिडको मुख्यालयात ८९ घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घरांचा ताबा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मिळणार होता, पण करोनामुळे ही ताबा प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यावेळी सिडकोने एक जुलैपासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने दिला जाईल असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केले होते.

सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत सिडको सध्या हजारो घरे बांधत आहे. त्यातील २५ हजार घरांचे तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, आणि द्रेणागिरी या सिडको नोडमध्ये बांधकाम सुरू आहे. दोन वषार्र्पूर्वी सिडकोने १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. त्यातील चार हजार घरांचा ताबा हा ऑक्टोबर २०२० मध्ये दिला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते, पण करोनामुळे ते पाळता आले नाही. या काळात सिडकोने पाच हजार घरांची पूर्ण रक्कम स्वीकारली होती. त्या लाभार्थीना दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याने नाराजी वाढत होती. सिडकोने या काळात दंडात्मक रक्कम माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता, तरीही हजारो ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरल्याने बँक व भाडे असे दोन्ही खर्च सोसत होते. गेल्या वर्षी करोनामुळे ऑक्टोबरमध्ये घरांचा ताबा देण्यात न आल्याने सिडकोने नंतर एक दोन आणखी मुदती दिल्या, पण त्याही कामगार समस्या आणि टाळेबंदीमुळे शक्य झाले नाही. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी यासाठी एक विहित कालावधी कार्यक्रम आखून एक जुलैपासून घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे गुरुवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली. घराची सर्व रक्कम व देखभाल खर्च भरणारे तीन हजार ग्राहक सध्या आहेत. त्यांना गुरुवारपासून ताबा देण्यास सुरुवात झाली असून कळंबोलीतील लाभार्थीपासून प्रारंभ झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ११ लाभार्थीना सदनिकांचा ताबा देण्यात आला. त्याचवेळी सिडकोत ८९ लाभार्थीना घरांची नोंदणी व करारनामा करण्यात आल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, कैलाश शिंदे उपस्थित होते.

घणसोली, खारघर, तळोजा, कळंबोली, आणि द्रोणागिरी येथे १४ हजार ८३८ घरे बांधली जात असून यातील ५२६२ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व ९५७६ घरे ही अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची घरे ही ईडब््ल्यू साठी तर २९ चौरस मीटर घरे ही एलआयजीसाठी आहेत. या योजनेतील घरांना सिडकोने शास्त्रीय संगीतातील रागांची नावे दिली असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांचे संगीतप्रेम सर्वश्रुत आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

नवी मुंबई विमानतळाला सिडकोने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने प्रकल्पग्रस्तांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही असंतोष आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नवी मुंबईत दौरा आयोजित करून कळंबोलीत जात सिडको लाभार्थीना घरांचा ताबा देण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सिडकोची घरे ही इतर खासगी विकासकांपेक्षा किफायतशीर व परवडणारी आहेत. अतिशय चांगले बांधकाम करण्यात आलेली ही घरे सर्वसामान्यांच्या विश्वासाला अधिक बळकटी देणारी आहेत. या गृहनिर्माण योजनेसाठी केंद्र सरकारचा असलेला अनुदानाचा भार हा सिडकोने उचलला असून सामाजिक बांधिलकी जपली आहे. एक जुलैपासून या योजनेतील घरांचा ताबा देण्याचे आश्वासन सिडकोने पाळले आहे.

-एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, राज्य

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने लाभार्थीचा सहानभूतीने विचार करून निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्राहकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले असून अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून सर्व लाभार्थीना टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा दिला जाणार आहे.

-संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको