पनवेल परिसरात १९ जणांना डेंग्यूची लागण झाल्याच्या मुद्दय़ावर महासभेत टीका झाल्यानंतर पालिकेने डेंग्यू, मलेरियाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.

४९ विहिरी व तलावांत तसेच खड्डे, नाले, गटारे, दलदल असलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. जुन्या टायरमध्ये पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता विचारात घेऊन १०५ ठिकाणचे जुने टायर हटवण्यात येणार आहेत. पनवेलमधील दोन हजार २०२ वसाहती, बंगले, झोपडपट्टय़ांना नोटीस बजावण्यात येणार आहे, ८७ टायरविक्रेते, ३१ रोपवाटिका, ६८ नारळविक्रेत्यांना आणि १३५ बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंग्यू, मलेरिया जनजागृतीसाठी २० ठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि पत्रके देऊन जनजागृती करण्यात येत आहे. औषधफवारणी व धूरफवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेने दिली. आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली आहे. धूरफवारणी योग्य रीतीने केली नसल्याचेही आरोप महासभेत करण्यात आले होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धूरफवारणी, नालेसफाई करण्यात आली आहे, महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये. घरात जिथे पाणी साचते त्या जागा वेळेवर स्वच्छ कराव्यात.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका