नवी मुंबईतील पालिका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचे करोनाकाळातील अनुभव..
संतोष जाधव, लोकसत्ता
करोनाकाळात डॉक्टरांबरोबर परिचारिका गेली दीड वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता त्या खंबीरपणे उभ्या आहेत. स्वत:सह कुटुंबीय बाधित झाले तरी त्या त्याच सेवाभावनेने रुग्णसेवा देत आहेत. रुग्णांना जीवदान देतोय, याचा अभिमान असून यात कुठेही खंड पडू न देता ही रुग्णसेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ‘जागतिक परिचारिका’ दिनानिमित्त नवी मुंबईतील पालिका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचे करोनाकाळातील अनुभव..
लढण्याची हीच ती वेळ!
मनात भीती होती; परंतु लढण्याची तीच वेळ होती. सुरुवातीला इंडिया बुल येथे काम करताना प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात सतत येत होतो. मधुमेहाचा त्रास होता, पण कर्तव्यही महत्त्वाचे होते. त्यानंतर बेलापूर माता बाल रुग्णालयातही काम केले. या वेळी माझ्यासह मुलगा,पती करोनाबाधित झालो, पण यातून बाहेर पडून पुन्हा रुग्णसेवा करायची जिद्द होती, ती आजपर्यंत सुरूच आहे.
– शहनाज शेख
पीपीई किटचा प्रचंड त्रास
सतत ‘पीपीई’ किट घालून काम करावे लागते. प्रचंड त्रास होतो. अशा परिस्थितीत १२ तासही काम केले आहे. आई-बाबा गावाला होते. त्यामुळे त्यांनाही भीती वाटत होती. सातत्याने पीपीई किट घालून काम केल्याने शरीरावर संसर्ग झाला. काही खाता येत नाही, बाथरूमला जाता येत नाही. अनेक अडचणी येत होत्या; परंतु देश सेवा करतोय, हाच भाव मनात होता. त्याप्रमाणे आजही अविरत काम करतोय व रुग्णांना जीवदान देतोय, याचा अभिमान वाटतो.
– मेघा चाहकर
कुटुंबियांना अभिमान
सुरुवातीला वाशी सार्वजनिक रुग्णालय येथे काम केले. विविध प्रकारचे रुग्ण येत होते. आपलेच घरचे रुग्ण करोनाबाधित आहेत याच भावनेने सेवा केली. पीपीई किट घालून काम करणे किती कठीण आहे याचा प्रचंड त्रास होत असे. मात्र रुग्ण बरा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदापुढे हा त्रास काहीच नसे. आपल्यापेक्षाही वडीलधारी माणसे हात जोडतात व जसे काही देव म्हणून पाया पडतात. तेव्हा कामाचे समाधान वाटते. कुटुंबांना आता आमचा अभिमान वाटतो.
– अश्विनी सरदार
सेवाभाव कायम
सुरुवातीला नेरुळ येथे कार्यरत होते. प्रत्यक्ष रुग्णांच्या चाचण्या करून त्या मुंबईला पाठवाव्या लागत होत्या. त्यानंतर पालिकेची नेरुळ येथे प्रयोगशाळा झाली. तेव्हाही प्रत्यक्ष करोना रुग्णांच्या सातत्याने संपर्कात येत होतो. घाबरलेल्या रुग्णांना धीर देण्याचे काम केले. माझ्यामुळे तीन मुले व पतीही करोनाबाधित झाले. तरीही सेवाभाव मनात ठेवून आजही रुग्णसेवा करीत आहे.
– श्वेता वराडे
कामाचा आनंद
करोनाकाळात सर्वच आरोग्यसेवकांनी दिवसरात्र का केले. पत्नीही परिचारिका असल्याने कुटुंबाची काळजी होतीच; परंतु कर्तव्यासाठी दोघेही घराबाहेर पडत होतो. दोघांनाही करोना झाला, पण अडचणीवर मात करून आता देशाला आपली गरज आहे हे ओळखून मनापासून काम केले. अनेकांना आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपलीही मदत झाली याचा अभिमान वाटतो.
– प्रकाश बारवे- (ब्रदर)
