सरकारने मंजूर केलेला वाढीव अडीच चटई निर्देशांक (एफएसआय) वापरण्यासाठी पालिकेच्या नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या वाशी येथील सात इमारतींच्या प्रस्तावांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्त स्थागिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी याबाबत याचिका दाखल केली असून वाढीव चटई निर्देशांक देण्यापूर्वी न्यायालयाने नेमलेल्या समितीचे प्रमाणपत्र सर्व धोकादायक इमारतींना अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सादर करण्यात आलेल्या आठ प्रकरणांत असे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील वाढीव चटई निर्देशांक प्रकरणाला नवनवीन धुमारे फुटू लागले आहेत. त्यामुळे वाढीव चटई निर्देशांकांर्तगत कामाला अद्याप सुरुवात झालेली नसताना आमदार मंदा म्हात्रे यांनी चार चटई निर्देशांकाची मागणी केली आहे. अडीच चटई निर्देशांक मंजूर झालेल्या वाशीतील आकाश सोसायटीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे चटई निर्देशांकाचे काय होणार आणि धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून जगणाऱ्या रहिवाशांना चांगल्या घरात राहण्याची संधी मिळेल का, असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सिडकोने वाशी सेक्टर नऊ व दहामध्ये बांधलेल्या अनेक इमारती निकृष्ट कामाचा नमुना असल्याने त्यांना वाढीव चटई निर्देशांक देऊन त्या इमारतींची पुनर्बाधणी करण्यात यावी, अशी अनेक वर्षांची मागणी युती सरकारने आठ महिन्यांपूर्वी मंजूर केली. ही मागणी मान्य करताना सरकारने सिडकोनिर्मित धोकादायक इमारती आणि तीस वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असलेल्या इमारतींचा त्यात सहभाग करण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील ८१ इमारतींची यादी जाहीर केली आहे. या इमारतीव्यतिरिक्त शहरात अनेक इमारती धोकादायक व मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतींसाठी वाढीव चटई निर्देशांकाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त केलेल्या पाच जणांच्या समितीचे धोकादायक इमारत म्हणून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना अशा प्रकारच्या प्रमाणपत्रापासून वगळण्यात आले आहे. ठाकूर यांनी सरकारच्या याच निर्णयाला आव्हान दिले आहे. धोकादायक इमारत ठरविण्यासाठी न्यायालयाने समिती स्थापन केली असताना वाढीव एफएसआयची मागणी करणाऱ्या सर्वच इमारतींची तपासणी करणे अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. यात तीस वर्षांपूर्वीनंतरच्या इमारतींना वगळण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अडीच चटई निर्देशांक देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या वाशी सेक्टर नऊ व दहामधील आठपैकी सात प्रस्तावांना पालिका यानंतर न्यायालयाच्या मान्यतेशिवाय मंजुरी देऊ शकणार नाही. यात वाशी सेक्टर आठ व दहामधील अवनी, श्रद्धा, एकता, कैलास, जय महाराष्ट्र, एफ टाईप, जेएन ३ आणि एफ ४ या इमारतींचा समावेश आहे. यात सेक्टर दहामधील एफ टाईप इमारतींच्या प्रस्तावित आकाश सोसायटीला काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अडीच चटई निर्देशांकाची परवानगी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court stay on increasement in fsi in vashi
First published on: 23-12-2015 at 02:22 IST