सोमवारच्या सुट्टीनंतर बँकांमध्ये झुंबड; एटीएमसमोर रांगाच रांगा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीनंतर आठ दिवसांमध्ये नवी मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बँका बंद असल्याने मंगळवारी सकाळी नवी मुंबईतील कोपरखरणे, ऐरोली, सानपाडा, एपीएमसी मार्केटमधील बँकांमध्ये पैशांसाठी झुंबड उडाली होती. तर एटीएमबाहेर मोठय़ा प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी बँका उशिरा सुरू झाल्याने काही ठिकाणी एटीएम आणि बँकेत पैसे नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते.
नवी मुंबईत एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये बाहेर मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची पैशांची देवाणघेवाणीसाठी गर्दी झाली होती. सहकार क्षेत्रातील पारिसक बँक, अभ्युदय बँक, शामराव विठ्ठल बँक या सहकार बँकांनी शाखा उशिरा उघडल्याने पैसे भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी त्रागा केला. सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती; मात्र पैसेच न आल्याने बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.
वाइन शॉपचा धंदा तेजीत
दिघा, ऐरोली, कोपरखरणे, बेलापूर आणि तुभ्रे परिसरांतील झोपडपट्टी भागातील काही वाइन शॉप विक्रेत्यांनी पाचशेची नोट घेऊन येणाऱ्यांना संपूर्ण रकमेच्या खरेदीचे आमिष दाखवून पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारल्या. तर काही बारचालकांनी थेट पाचशे आणि हजार रुपयांचे बिल करण्याचे सांगून पैसे स्वीकारणे सुरू ठेवले आहे.
दुसऱ्या दिवशीही भाजीला भाव नाही
नवी मुंबई : चलन तुटवडय़ामुळे भाज्यांची आवक-जावक स्थिरावली आहे. तरीही भाव चांगलेच गडगडल्याने उत्पादकांना फटका सोसावा लागला. भाजीला तितकासा उठाव नसल्याने पाच ते दहा टक्के भाजी विक्रीविना पडून आहे. तिला दुसऱ्या दिवशीही उठाव न मिळाल्यास ती उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनाचा फटका नाशिवंत शेतमाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजी बाजाराला चांगलीच धग सहन करावी लागली आहे. मागील मंगळवारी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर बुधवारी व्यापाऱ्यांनी खरेदीदारांनी आणलेल्या जुन्या नोटा स्वीकारल्या; मात्र व्यापाऱ्यांकडे आलेल्या जुन्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनीही अशा नोटा स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे गुरुवारपासून भाजी घाऊक बाजारात खरेदीदार आहेत; पण त्यांच्याकडे नवीन नोटा नाहीत. त्यामुळे उधारी शेतमाल देण्याशिवाय व्यापाऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही. सोमवारी भाजी बाजारात ५९० ट्रक टेम्पो भरून भाजी राज्यातील विविध प्रांतांतून आली आणि मुंबई भागात ती ७४० ट्रक टेम्पोतून गेल्याने आवक आणि जावक स्थिरावल्याचे चित्र आहे. मात्र बहुतांशी सर्वच प्रमुख भाज्या घाऊक बाजारात स्वस्त झाल्या असून दहा ते बारा रुपयांच्या आत त्यांची विक्री होत आहे. त्यामुळे त्या किरकोळ बाजारात स्वस्त मिळणे अपेक्षित आहे. भाजीप्रमाणेच फळ बाजारातही २३९ ट्रक भरून फळे आली आहेत.
कामगारांना फटका
हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारांना नोटांच्या बदलीचा थेट फटका बसला. दैनंदिन ३०० ते ४०० रुपयांची रोजंदारी असणाऱ्या नागरिकांना पैसे देण्यासाठी काही मर्यादा असल्याने त्याचबरोबर सुट्टे पैसे नसल्याने आठवडाभरापासून ठेकेदारांकडून वेळेवर पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेकांनी पत्नीकडील दागिने गहाण ठेवून तात्पुरता उदरनिर्वाह सुरू केला आहे.