नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात दशेरी, लंगडा आंब्यांसह पावसाळी फळांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात ओले खजूर, सीताफळ, डाळिंब दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या बाजारात सीताफळाच्या १५ ते २० खोक्यांची आवक सुरू झाली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यातून सीताफळाची आवक होत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत या फळांचा हंगाम असतो. सध्या गुजरात येथून ओले खजूर दाखल होत आहेत.

बाजारात सध्या २ ते ४ गाडय़ा ओले खजुरांची आवक होत आहे. खजुराला १० किलोसाठी ५००ते ७०० रुपये बाजारभाव आहे. नगर, नाशिक आणि कोल्हापूर येथून डाळिंब येत आहे. रोज पाच ते सहा गाडय़ा येत आहेत.

घाऊक बाजारात डाळिंबाची प्रतिकिलो ३० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. बाजारात सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वॉशिंग्टन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेतील सफरचंदांची आवक सुरू आहे. ऑगस्टमध्ये सिमला येथील सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते.

निम्म्याहून अधिक व्यापारी घरीच

मे महिन्यात ‘एपीएमसी’ हे करोना संसर्गाचे केंद्रिबदू ठरले होते. त्यामुळे बाजारातील व्यापारी एपीएमसीमध्ये प्रवेश करण्यासाठी डगमगत आहेत. सध्या ६० टक्क्यांहून अधिक व्यापारी अद्याप घरीच असल्याची माहिती घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.