पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी १४८ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांसह राजकीय संघटना आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सरकारी लोकसेवकांनी या राष्ट्रीय मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अनेक परिसर उजळून टाकले.

रविवारची स्वच्छता मोहीम संपली आणि सोमवारी सकाळी मात्र कळंबोली उपनगरातील कचराकुंडी शेजारी दैनंदिन पडलेला कचरा उचलण्यासाठी महापालिकेची कोणतीही घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे स्वच्छता मोहीम एका दिवशी छायाचित्र काढण्यापुरती होती का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

हेही वाचा – २९ तास रखडपट्टी; कोकण रेल्वेवर प्रवाशांचे अतोनात हाल, मालगाडी घसरल्याने अनेक गाडय़ांचा खोळंबा

पनवेल महापालिका क्षेत्रात अडीचशे मेट्रिक टन ओलासुका कचरा जमा होतो. रविवारी स्वच्छता मोहिमेमध्ये ३२ मेट्रिक टन कचरा जमा झाल्याचा दावा पालिकेच्यावतीने करण्यात आला. परंतु सोमवारी कळंबोली उपनगरामध्ये विविध ठिकाणी कचरा कुंड्यांजवळ साचलेला दैनंदिन कचरा रस्त्याकडेला दिसत होता. दैनंदिन कचरा उचलण्याच्या घंटागाड्या उशिराने येत असल्याने हा कचरा साचल्याचे बोलले जात आहे. महापालिकेने यापूर्वी कचरा संकलनासाठी नेमलेल्या ठेकेदाराची मुदत ३० सप्टेंबरला संपली असून महापालिका प्रशासनाची नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जुन्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने अजून एक महिना काम करावे, अशी अपेक्षा असली तरी पहिल्या दरात संबंधित ठेकेदार काम करण्यास अनुत्सुक असल्याने ही कचरा कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

जुन्या ठेकेदाराला पाच वर्षांसाठी शहर स्वच्छतेसह, कचरा संकलन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत वाहतुकीचे काम दिले होते. मुदत संपल्यानंतर दर परवडत नसल्याने ही कचरा कोंडी झाली आहे. महापालिकेची कचरा कोंडी करणाऱ्या ठेकेदारापेक्षा नवीन ठेकेदार पालिका प्रशासनाने नेमावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : ८ ते १० तास  एकाच ठिकाणी ट्रेन; वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, आणि पुढे काय झाले वाचा 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल महापालिकेच्या सफाई विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली. काही मिनिटांत महापालिकेच्या घंटागाडीने संबंधित ठिकाणचा कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.